उल्हासनगरात स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणारा तरुण जेरबंद, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: August 19, 2022 20:06 IST2022-08-19T20:04:31+5:302022-08-19T20:06:41+5:30
मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघड करत, त्याला कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली.

उल्हासनगरात स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणारा तरुण जेरबंद, गुन्हा दाखल
उल्हासनगर- १४ ऑगस्ट रोजी चिकन आणण्यासाठी गेलेल्या विजयकुमार भारती या तरुणांने वडिलांना २ लाखाची खंडणी मागत स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला. मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघड करत, त्याला कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं -३ शांतीनगर परिसरात चंद्रकांत भारती हे कुटुंबासह राहतात. त्यांचा २२ वर्षीय मुलगा विजयकुमार भारती १४ ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता चिकन आणण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र घरी परत आला नाही. यानंतर, वडील चंद्रभान भारती यांच्यासह नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. १५ ऑगस्ट रोजी पहाटे दिड वाजता वडील चंद्रभान भारती यांना एका मोबाईल वरून फोन आला. फोन करणाऱ्यांनी विजयकुमार पाहिजे असल्यास, २ लाखाची खंडणी मागितली. यावर, घाबरलेले चंद्रभान भारती यांनी नातेवाईकांसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन व कॉल रेकॉर्ड तपासले असता कर्नाटकमधील निघाले. तसेच १५ ऑगस्ट रोजी विजयकुमार हा एकटाच रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
यानंतर, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी एक पथक कर्नाटक राज्यात मोबाईल लोकेशनवर पाठवले. पोलीस पथकाने मोबाईल लोकेशन व कॉल रेकॉर्डवरून विजय कुमारला स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली. पैशासाठी स्वतःच्या अपहरणाचा डाव रचून वडिलांकडून २ लाखाची खंडणी मागितल्याचे तपासात उघड झाले. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन स्वतःचा अपहरणाचा डाव खेळणाऱ्या तरुणाला अटक केल्याची माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.