अझहर शेख, नाशिक: माजी मंत्री छगन भुजबळ वापरत असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ‘मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्महाउसवर आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीम मध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक काेटी रूपये द्यावे लागतील..’ अशाप्रकारे संवाद साधून खंडणीची रक्कम पेठ तालुक्यातील करंजाळीजवळ स्वीकारली असता नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहात जाळ्यात घेतले. राहुल दिलीप भुसारे (२७,रा.करंजाळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मोबाइल क्रमांक ऑनलाइन पद्धतीने मिळविल्यानंतर संशयित राहुल याने पहिल्यांदा २३ एप्रिल रोजी संपर्क साधला. हा क्रमांक भुजबळ यांचे स्वीय सहायक फिर्यादी संतोष गायकवाड यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट केलेला असल्याने त्यांनी कॉल घेतला. यावेळी राहुल याने स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी सांगून सुरूवातीला १ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली. यानंतर पुन्हा २ मे रोजी संपर्क साधून तडजोड करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जास्त रक्कम द्यावी लागेल, असे सांगून १ कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली. ही बाब गायकवाड यांनी थेट पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांना सांगितली. यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना याबबत कर्णिक यांनी सुचना देऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी याप्रकरणी दोन पथके तयार केली. एका पथकाने गुजरात गाठले. धरमपूर येथे राहुल हा पैसे घेण्यासाठी आला नाही. त्याने करंजाळी येथे बोलविले. त्यावेळी पथकाने करंजाळी गाठली. तेथे पैशांची बॅग त्याने स्वीकारली असता गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हा पदवीधर असून त्याचे यापुर्वी कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून केवळ झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.