धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार; आरोपीनं वाशी पुलावर ढकलून दिल्यानं पीडिता जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 14:31 IST2020-12-25T14:27:30+5:302020-12-25T14:31:01+5:30
उपचारादरम्यान उघडकीस आला प्रकार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार; आरोपीनं वाशी पुलावर ढकलून दिल्यानं पीडिता जखमी
नवी मुंबई : वाशी खाडीपूल लगत रेल्वे पोलिसांना जखमी अवस्थेत तरुणी आढळून आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वाशी रेल्वे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी मानखुर्द रेल्वेमार्गावर खाडीपूल लगत मंगळवारी सकाळी २५ वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी ६ च्या सुमारास हि तरुणी तिथे पडली असल्याचे वाशी रेल्वेपोलिसांना समजले होते. यानुसार पोलिसांनी तिला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले होते. वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत. मात्र वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेत तिच्यावर बलात्कार करून ठार मारण्याच्या उद्देशाने तिला रेल्वेतून खाली ढकलून देण्यात आले. त्यानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात एका व्यक्तीचा समावेश आहे की अधिक व्यक्तीचा याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.