Woman Harassment by Rapido Driver in Bengaluru: रॅपिडो चालकाने पाठीमागे बसलेल्या एका तरुणीशी छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बंगळुरूतील या घटनेवर संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी आता गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
बंगळुरूत नवीन असलेल्या तरुणीने रॅपिडो बाईक बुक केली होती. दुचाकीवरून जात असताना चालकाने तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. तरुणीने याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि सगळा घटनाक्रम सांगितला.
आरोपीचे नाव काय आहे?
बंगळुरू मध्यचे पोलीस उपायुक्त अक्षय एम. हाके यांनी याबद्दलची माहिती दिली. तरुणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. रॅपिडो चालकाने तिची छेडछाड केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी लोकेश याला अटक करण्यात आली आहे, असे हाके म्हणाले.
तरुणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, ६ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये माझ्यासोबत असं काही घडलं ज्याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. चर्च स्ट्रीटपासून रॅपिडो राईड रुमवर जात असताना दुचाकी चालकाने माझे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. हे इतकं अचानक घडलं की मला काही सूचेना.
त्याने पुन्हा तसेच केले. तेव्हा मी त्याला म्हणाले की भैय्या काय करत आहात. असं करू नका. पण तो काही थांबत नव्हता. मी खूपच घाबरले होते. मी या ठिकाणी नव्यानेच आले आहे. त्यामुळे मी त्याला दुचाकी थांबवायलाही सांगू शकत नव्हते. आम्ही पोहोचलो, तेव्हा मी अक्षरशः भीतीने शहारत होते आणि रडत होते, असे तरुणीने म्हटले आहे.