उल्हासनगरमध्ये धावत्या रिक्षातून तरुणीची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:53 IST2020-02-11T05:53:23+5:302020-02-11T05:53:51+5:30

विद्यार्थिनीसोबत तरुणाचे अश्लील चाळे

Young woman jumps from a running ramp in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये धावत्या रिक्षातून तरुणीची उडी

उल्हासनगरमध्ये धावत्या रिक्षातून तरुणीची उडी

उल्हासनगर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना शनिवारी उल्हासनगरमध्ये घडली. काही दक्ष नागरिकांनी या तरुणीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित तरुणी ही शनिवारी सकाळी ९ वाजता कॉलेजला जाण्यासाठी एका रिक्षात बसली. त्या रिक्षात आधीच मास्क लावलेला एक तरुण होता. ही रिक्षा नेहमीच्या मार्गाने न जाता सी ब्लॉक रस्त्याने नेण्यात आली. त्यानंतर, आरोपी तरुणाने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तरुणीने सांगूनही रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे सुटका करण्यासाठी तिने धावत्या रिक्षातून उडी मारली.

तिच्यापाठोपाठ आरोपीनेही उडी मारून तिची छेड काढणे सुरूच ठेवले. या झटापटीत तरुणीने त्याला लाथ मारून दूर केले. अखेर, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या तरुणाला दम दिल्याने तो रिक्षातून पळून गेला. यानंतर गोलमैदान येथून रिक्षा पकडून तरुणी कॉलेजला गेली. तिने हे घरच्यांना सांगताच शनिवारी दुपारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकाराने पीडित तरुणी घाबरल्याने तिने कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: Young woman jumps from a running ramp in Ulhasnagar