लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करत, तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा प्रकार समोर आला. ही घटना कांदिवली, मुंबई येथील एका हॉटेलमध्ये, तसेच कारमध्ये घडली.
या प्रकरणी, ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली) आणि अन्य तीन मित्र अशा चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा प्रकार कांदिवली येथे घडल्याने गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलिसांत वर्ग करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्यामुळे ती पुण्यात आहे. २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. लग्नाच्या आमिषाने खान याने तरुणीला जाळ्यात खेचले.
त्यातूनच ती त्याला भेटण्यासाठी कांदिवलीत गेली. येथील एका हॉटेलमध्ये दोघे भेटले. त्यावेळी खान याने शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. तिला कारने नेऊन मुंबई आणि पुणे येथे बलात्कार केला. खान तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना, त्याने अन्य मित्रांना बोलावून घेतले. तिघांनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपींनी तरुणीचे अत्याचार करतानाचे काढलेले छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली.