Crime News : एका जन्मदात्या बापाने आपली १८ महिन्यांची मुलगी किन्नर असल्याचे समजून तिचा जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना बिहारमधील भवानीपूर येथील भामेठ गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील, त्याची आई आणि भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, या क्रूर पित्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. चिमुकलीच्या आईने स्वतः पती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मदेव कुमारने त्याची १८ महिन्यांची मुलगी जान्हवी कुमारी हिचे तोंड आणि नाक दाबून निर्घृण हत्या केली. मृत चिमुकलीची आई हीना कुमारी यांनी भवानीपूर पोलीस ठाण्यात पती ब्रह्मदेव कुमार, सासू राधा देवी आणि दीर कैलाश राम यांच्यावर मुलीची हत्या केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.
आधीही केलेला प्रयत्न
यावेळी तक्रार दाखल करताना हीना कुमारी म्हणाल्या की, 'माझे पती, सासू आणि दीर जान्हवीला तिच्या जन्मापासूनच किन्नर म्हणत होते. माझ्या पतीने यापूर्वीही आमच्या निष्पाप मुलीला तृतीयपंथी समजत मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी मी माझ्या मुलीला वाचवले होते. मंगळवारी मी मक्याची सालं काढण्यासाठी बाहेर गेले होते. दरम्यान, पती ब्रह्मदेव कुमारने, त्याची आई राधा देवी आणि भाऊ कैलाश राम यांच्या प्रभावाखाली येऊन मुलीचे नाक आणि तोंड दाबून तिची हत्या केली.'
पत्नीचे पाय धरून केला गुन्हा कबूल
हीना कुमारी घरी परतली तेव्हा तिच्या पतीने तिचे पाय धरले आणि सांगितले की, त्याने आपल्या मुलीची हत्या केली आहे. पण, ही गोष्ट कुणालाही न संगण्याची धमकी देखील दिली. परंतु, हीनाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच भवानीपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक विनोद कुमार घटनास्थळी पोहोचले. मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यानंतर ब्रह्मदेव कुमारला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याची आई आणि भाऊ फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.