महाड, पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी करणारी टोळी कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:40 IST2018-11-18T23:39:51+5:302018-11-18T23:40:12+5:30
आरोपींकडून ६५ हजार १०० रु पयाचे जिवंत काडतूस, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

महाड, पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी करणारी टोळी कार्यरत
बिरवाडी : महाड, पोलादपूर तालुक्यांत हत्याराची तस्करी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत महाड तालुक्यातील ढालकाठी येथील रहिवासी तुलसीराम चंद्रकांत वाडकर (३३) व पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील राजेंद्र राजू साटम यांना हत्यारासह अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ६५ हजार १०० रु पयाचे जिवंत काडतूस, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस गस्तीवर असताना १२ नोव्हेंबर रोजी दिवा पूर्व येथे एका संशयित व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्टा आढळला. त्याने दिलेल्या माहितीवरून ठाणे पोलिसांच्या पथकाने, सापळा रचून तुलसीराम चंद्रकांत वाडकर याला १२ नोव्हेंबर रोजी देशी बनावटीचे पिस्तूलसह अटक करण्यात आली. त्यानंतर १५ नोव्हेंबरला पोलादपूर तालुक्यातील राजेंद्र राजू साटम याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ बोअर बंदूक (रायफल ) व एक १२ बोअर काडतूस हस्तगत करण्यात आले.
अधिक चौकशीत आणखी एक १२ बोअर बंदूक (रायफल), २ जिवंत राऊन्ड (काडतूस), असा एकूण ६५ हजार १०० रु पये किमतीचा माल हस्तगत केला. रविवारी महाड पोलिसांनी याबाबत पत्रक प्रसिध्द करून माहिती दिली.
रायगड पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ
हत्याराची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुक्काम रायगड जिल्ह्यात असल्याची बाब समोर आल्याने या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गुप्त विभागाच्या कर्मचाºयांकडून गुन्हेगाराची माहिती मिळविण्यात अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत रायगड पोलीस अंधारात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यापूर्वी देखील जनावर तस्करीमध्ये ठाणे पोलिसांनी महाड व पोलादपूरमधून आरोपीना अटक केल्याचे उघड झाले आहे.