महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण...
By जितेंद्र कालेकर | Updated: September 22, 2022 23:58 IST2022-09-22T23:51:54+5:302022-09-22T23:58:36+5:30
या अपघाताची चौकशी करण्यात येत असून रात्री अज्ञात महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचेही कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका मोटारकारच्या धडकेत मोटारसायकलीवरुन डिलिव्हरी बॉय अजय ढोकणे (१९, रा. पातलीपाडा, ठाणे) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी महिला चालकाविरुद्ध रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पातलीपाडा येथील हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल येथे एक महिला तिच्या मोटारकारने आपल्या मुलीला घेण्यासाठी आली होती. ती तिची कार उभी करीत असतांनाच दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या कारची धडक तिथून जाणाऱ्या अजय या दुचाकीस्वाराला बसली. या अपघातामध्ये तो तिच्या मोटारीवर आदळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये तिने त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखलही केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या अपघाताची चौकशी करण्यात येत असून रात्री अज्ञात महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचेही कासारवडवली पोलिसांनी सांगितले.