महिलेचा मृतदेह गोणीमध्ये आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:04 IST2020-11-30T00:03:52+5:302020-11-30T00:04:00+5:30
या महिलेच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. तिची ओळख पटेल असे काहीच सापडले नाही.

महिलेचा मृतदेह गोणीमध्ये आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांना आव्हान
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मौजे चिंचोटी येथील रस्त्याच्या बाजूला शनिवारी रात्री ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीची हत्या करून गोणीमध्ये भरून फेकलेला मृतदेह सापडला आहे. वालीव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेची ओळख पटवून हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे चिंचोटी येथील सातिवली खिंडीच्या उतरंडीवर रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. अनोळखी महिलेची आरोपीने कोणत्या तरी कारणावरून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा इराद्याने तिचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी गोणीमध्ये भरून फेकून दिला आहे. या महिलेच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. तिची ओळख पटेल असे काहीच सापडले नाही.
महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून या वयोगटातील महिला कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग आहे का, याची माहिती मिळवत आहोत. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. - विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे