महिलेचा खून करुन अंगावरील दागिने पळविले, देवरी येथील धक्कादायक घटना; श्वान पथकाला करण्यात आले पाचारण
By अंकुश गुंडावार | Updated: August 17, 2022 22:02 IST2022-08-17T21:58:44+5:302022-08-17T22:02:39+5:30
प्राप्त माहितीनुसार शिशुकला साखरे या टेलरिंगचेे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलीटेक्नीक काॅलेज देवरी येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.

महिलेचा खून करुन अंगावरील दागिने पळविले, देवरी येथील धक्कादायक घटना; श्वान पथकाला करण्यात आले पाचारण
देवरी (गोंदिया): येथील पंचशील चौकमध्ये भाड्याने राहणाऱ्या महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.१७) दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शिशुकला साखरे (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असून घरातील सामानसुध्दा अस्ताव्यस्त पसरलेले होते. यामुळे या महिलेची हत्या लूट करण्यासाठी तर करण्यात आली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे देवरी शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार शिशुकला साखरे या टेलरिंगचेे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलीटेक्नीक काॅलेज देवरी येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. सायंकाळी ५ वाजता दोन्ही मुले घरी आली, तेव्हा बाहेरुन दरवाजा लावून असलेली कुंडी उघडताच त्यांना त्यांची आई रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडून दिसली.
दरम्यान या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूचे शेजारी व नागरिक धावून आले. दरम्यान या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला. गोंदियावरुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील परिस्थिती आणि खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने आणि घरातील कपाट आणि इतर सामानसुध्दा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा खून लूटमार करण्याच्या प्रकारातून तर झाला नसावा ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.