तेलंगणातील यादाद्री-भुवनगिरी जिल्ह्यात एका धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे, ज्याला सुरुवातीला केवळ एक रस्ता अपघात समजले गेले होते. मात्र, पोलीसांच्या सखोल तपासानंतर या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले. एका शोरूम व्यवस्थापकाची सुनियोजित हत्या करून, तो अपघात असल्याचा देखावा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या कटात त्या व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि एका मित्राचा सहभाग होता. या तिघांनाही १४ जुलै रोजी अटक करण्यात आली.
१३ जुलैच्या रात्री वस्थापुला स्वामी आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे १२० फूट फरफटत गेली. या अपघातात स्वामी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आधी वाटला रस्ते अपघात पण...
पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाला एक सामान्य रस्ता अपघात मानले. परंतु, तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्स तपासले असता, या अपघातामागील कट उघड झाला. पोलिसांना कळाले की, मृत स्वामी यांच्या पत्नीची ओळख मुख्य आरोपी जी. साई कुमारसोबत २०१७ मध्ये झाली होती. २०२४ मध्ये दोघांमध्ये पुन्हा संपर्क वाढला आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले.
पतीच्या त्रासाला कंटाळली!
याच दरम्यान, स्वामी यांचे पी. महेश नावाच्या व्यक्तीच्या पत्नीशीही संबंध असल्याचे समोर आले. जेव्हा महेशला या संबंधांची कुणकुण लागली, तेव्हा तो संतापाने बेभान झाला. दुसरीकडे, स्वामींच्या पत्नीने त्यांना जाब विचारला असता, त्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने आपला प्रियकर साई कुमार आणि महेश यांच्यासोबत मिळून स्वामीला कायमचे संपवण्याचा कट रचला.
तिघांनी मिळून स्वामीच्या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याची योजना आखली. याच योजनेनुसार, १३ जुलैच्या रात्री कारने धडक देऊन हत्येचा कट अंमलात आणला गेला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि डिजिटल ट्रेसिंगमुळे संपूर्ण सत्य समोर आले. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचणे, पुरावे मिटवणे आणि अपघाताचा देखावा निर्माण करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.