Wife kills husband with lover in front of daughter in Delhi | तिने प्रियकराच्या साथीने पतीला ठार मारलं, मुलीने सगळं पाहिलं!
तिने प्रियकराच्या साथीने पतीला ठार मारलं, मुलीने सगळं पाहिलं!

नवी दिल्ली: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं तिच्या मुलीसमोरच पतीची हत्या घडवून आणली. नवी दिल्लीतील समयपूर बदली परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या घटनेचं गूढ उलगडलं.

पती सोनूची हत्या झाल्याचा बनाव रचत महिलेनं खुन्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र संशय आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. पतीच्या हत्येचा दावा करणारी महिला तिचा शेजारी सागरच्या सतत संपर्कात होती. विशेष म्हणजे सोनूची हत्या झाल्याची तक्रारदेखील त्याच्या भावानं नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

सोनू पत्नी आणि मुलीसह मध्यरात्री झोपायला गेल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. मात्र पतीची हत्या होत असताना आपल्याला कोणताही आवाज ऐकू न आल्याचा दावा पत्नीनं केला. कोणीतरी येऊन पतीची हत्या करुन गेलं, असं महिलेनं पोलिसांना सांगितलं. महिलेच्या दाव्याबद्दल पोलिसांना शंका आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले. त्यामधून महिला शेजारी राहणाऱ्या सागर नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. 

कॉल रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर पोलिसांनी सागरची चौकशी केली. त्यावेळी त्यानं खुनाची कबुली दिली. सोनूच्या पत्नीच्या मदतीनं हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. सागर आणि सोनूच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसातच ते दोघे पळून जाणार होते. त्यामुळेच सोनू झोपल्यानंतर महिलेनं सागरला घरी बोलावलं आणि नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर महिला रात्रभर सोनूच्या मृतदेहाजवळ बसून होती. सकाळी 7 च्या सुमारास तिनं पतीची हत्या झाल्याचं म्हणत आरडाओरडा सुरू केला. मात्र कॉल रेकॉर्ड तपासल्यानं या प्रकरणाचा उलगडा झाला.
 

Web Title: Wife kills husband with lover in front of daughter in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.