मैत्रिणीच्या मदतीने पत्नीचा केला खून; लातुरातील घटना
By हरी मोकाशे | Updated: February 22, 2024 18:53 IST2024-02-22T18:53:35+5:302024-02-22T18:53:41+5:30
आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

मैत्रिणीच्या मदतीने पत्नीचा केला खून; लातुरातील घटना
लातूर : पत्नीशी भांडण करुन पतीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने चाकूने वार करुन पत्नीचा खून केल्याची घटना शहरानजिकच्या पाखरसांगवी येथील राजे शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवेली विठ्ठल कुरणे (२३) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, शहरानजिकच्या पाखरसांगवी येथील राजे शिवाजीनगरात विठ्ठल महादेव कुरणे हे राहतात. बुधवारी रात्री विठ्ठल कुरणे याने पत्नी नवेली कुरणे यांच्यासोबत भांडण केले. दरम्यान, त्याच्या मैत्रिणीसोबत संगनमत करुन त्याने मैत्रिणीच्या मदतीने पत्नीवर धारदार चाकूने वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच मृत्यूमुखी पडल्या. ही घटना मयताच्या माहेरील मंडळींना समजल्यानंतर ते तात्काळ दाखल झाले.
याप्रकरणी मयताचा भाऊ गणेश प्रकाश माने (रा. किल्लारी, ता. औसा) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी पती व त्याच्या मैत्रिणीविरुध्द कलम ३०२, ३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एम. माेरे करीत आहेत.
खुनाच्या कारणांचा तपास सुरु...
पत्नीच्या खूनप्रकरणी तिचा पती आणि त्याची मैत्रिण या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यता आले आहे. खुनामागील कारणाचा शोध घेतला जात आहे, असे पोलिस उपनिरीक्षक एस.एम. मोरे यांनी सांगितले.