उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी त्यांची सून आणि तिच्या प्रियकरावर हा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी कशिश आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मृतकाचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
सहारनपूरमधील देवबंद येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवल्याचे म्हटले जात आहे. या घटनेसंदर्भात, मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी विशाल सिंघल याची पत्नी कशिश आणि तिच्या प्रियकराने विशालला विष देऊन मारल्याचा आरोप केला आहे. उत्तराखंडमधील देहरादून येथे राहणाऱ्या नंदिनी आणि तिच्या बहिणींनी देवबंद कोतवाली येथे येऊन त्यांची वहिनी कशिश आणि तिच्या प्रियकरावर आपला भाऊ विशालची हत्या केल्याचा आरोप लावला आहे.
तीन वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, विशाल सिंघल हा त्यांचा एकुलता एक भाऊ होता. त्याने सुमारे तीन वर्षांपूर्वी देवबंद येथील रहिवासी कशिशशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते देवबंदमधीलच एका मोहल्ल्यात भाड्याच्या खोलीत राहत होते. २ जुलै रोजी विशाल कामासाठी देहरादूनला गेला होता, परंतु काही कारणास्तव तो लवकर परत आला. नंदिनीच्या म्हणण्यानुसार, घरी परतल्यावर विशालला त्याची पत्नी एका अनोळखी पुरुषासोबत खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली.
विष देऊन केली हत्या आणि गुपचूप उरकले अंत्यसंस्कार
विशालच्या बहीणींनी असा आरोप केला की, कशिशने तिचा प्रियकर मनीष याच्यासोबत मिळून विशालला आधी मारहाण केली आणि नंतर विष देऊन त्याला ठार मारले. एवढेच नव्हे, तर कोणालाही न कळवता विशालचे अंत्यसंस्कारही करण्यात आले. नंदिनीने सांगितले की, प्रियकरासोबत पाहिले असल्याची माहिती विशालने तिला फोन करून दिली होती.
या प्रकरणाबाबत एसपी देहात सागर जैन यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतकाच्या पत्नी आणि तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांना कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. आता तक्रार आल्याने त्याची गंभीरपणे चौकशी केली जाईल. गरज भासल्यास कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. लवकरच या प्रकरणाचा उलगडा केला जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.