पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहताच पत्नीनं काढला व्हिडीओ अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 18:13 IST2019-07-18T18:12:48+5:302019-07-18T18:13:57+5:30
संतापलेल्या प्रेयसीचं धक्कादायक कृत्य

पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहताच पत्नीनं काढला व्हिडीओ अन्...
नोएडा: एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला विवाहबाह्य संबंध महागात पडला आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाचे त्याच्याच ऑफिसमधील तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. तिनं त्याला रंगेहात पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पती आणि त्याची प्रेयसी कारमध्ये असताना तिनं त्यांचं व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीनं थेट तिला कारनं धडक दिली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये हा प्रकार घडला.
पती त्याच्या प्रेयसीसोबत कारमधून फिरत असल्याची माहिती पत्नीला मिळाली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ती कारजवळ पोहोचली. थेट कारच्या समोर जाऊन तिनं व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रेयसीनं कार सुरू करुन थेट धडक दिली. कारच्या धडकेत जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिनं सेक्टर-४९च्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित महिला नोएडाच्या सेक्टर-७५ मध्ये राहते. तीदेखील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तर तिचा पती सेक्टर-१२६ मधील एका आयटी कंपनीत नोकरी करतो. हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखायचे. जानेवारी २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला. काही महिन्यांपासून पत्नीला पतीबद्दल संशय वाटू लागला. पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत का, याची माहिती मिळवण्याचा तिनं प्रयत्न केला. त्यावेळी ऑफिसमधील एका तरुणीसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर पत्नीनं दोघावंर नजर ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर १५ जुलैला तिनं पती आणि त्याच्या प्रेयसीला कारमध्ये रंगेहात पकडलं.