थिनर टाकून पत्नीला जिवंत जाळलं, अमरावतीतील घटना, पती अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: February 27, 2023 19:50 IST2023-02-27T19:49:08+5:302023-02-27T19:50:47+5:30

पती इकबाल हुसेन गुलाम हुसेन तातडीने गजाआड

Wife burnt alive by throwing thinner incident in Amravati | थिनर टाकून पत्नीला जिवंत जाळलं, अमरावतीतील घटना, पती अटकेत

थिनर टाकून पत्नीला जिवंत जाळलं, अमरावतीतील घटना, पती अटकेत

अमरावती: कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला जीवंत जाळण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास वलगाव येथील सतीनगर भागात ही घटना घडली. यात ती महिला सुमारे ४० टक्के जळाली. याप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली.

शाहीन परवीन (२७, रा. सतीनगर, वलगाव) असे जळालेल्या महिलेचे नाव असून, तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत २६ फेब्रुवारी रोजी वलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३४ च्या सुमारास वलगाव पोलिसांनी जखमी महिलेचा पती इकबाल हुसेन गुलाम हुसेन (रा. वलगाव) याच्याविरूध्द जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक करण्यात आली.

पोलिसांनुसार, पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असताना इकबाल हुसेन याने पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला पेटवून दिले. अचानक घडलेल्या त्या घटनेमुळे ती ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले. तिच्या अंगावर पाणी टाकून तिला तातडीने इर्विनमध्ये आणण्यात आले. तेथे ती ४० टक्के जळाल्याची नोंद घेण्यात आली. वलगाव पोलिसांनी इर्विनमध्ये तिचे बयाण नोंदविले.

Web Title: Wife burnt alive by throwing thinner incident in Amravati