बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची आता पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर याला काही प्रश्न विचारले होते. त्याची त्याने उत्तरे दिले आहेत. आरोपीने भारतात घुसखोरी केल्यावर नाव बदलले होते. विजय दास नावाने तो मुंबईमध्ये राहत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खानवर चाकू हल्ला का केला?
'आजतक'च्या वृत्तानुसार, शहजादने पोलिसांना सांगितले की, 'सैफ अली खानने खूप घट्ट पकडले होते. त्यामुळे त्याच्या पाठीत चाकूने वार केले. हल्ल्यानंतर घरातून पळून गेलो आणि इमारतीच्या बागेमध्ये दोन तास लपलो.'
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये घुसला होता. घरात घुसल्यानंतर घरातील कामगारांनी त्याला बघितले.
शहजाद बांगलादेशातून मुंबईत कसा आला?
बांगलादेशातील झालोकाथी जिल्ह्यातील असलेला शहजाद पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून मुंबईत राहत आहे. तो छोटी-मोठी काम करायचा. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम करायला लागला होता.
शहजादने भारतात घुसखोरी केल्यावर नाव बदलले. विजय दास असे नाव ठेवले. सात महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता. दावकी नदी पार करून त्याने भारतात प्रवेश केला.
घुसखोरी केल्यावर काही आठवडे तो पश्चिम बंगालमध्ये राहिला. त्यानंतर कामाच्या शोधात मुंबईमध्ये आला. एका स्थानिक व्यक्तीच्या आधार कार्डवर त्याने एक सीमकार्ड घेतले.
शहजादने आधार कार्ड बनवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्याला बनवता आले नाही. ज्या ठिकाणी कागदपत्रे मागितली जाणार नाही, अशाच ठिकाणी त्याने काम केले. कामगार कंत्राटदार अमित पांडेंनी त्याला वरळी आणि ठाण्यातील पब आणि हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगचे काम मिळवून देण्यात मदत केली होती.