बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:55 PM2020-07-08T21:55:01+5:302020-07-08T21:59:19+5:30

कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक का करत नाहीत, असा प्रश्न जनमानसात चर्चेला आला आहे.

Why don't the police arrest builder Dangre? | बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही?

बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही?

Next
ठळक मुद्देप्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागा दुसऱ्याला विकलीच कशी?न्यायालयाचा अवमान : पोलीस मात्र गप्प, पीडितांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक का करत नाहीत, असा प्रश्न जनमानसात चर्चेला आला आहे. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या बिल्डर डांगरेला पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप होत असून, डांगरेला पोलिसांनी तातडीने अटक केली नाही तर पीडित मंडळी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे प्रकरण तसेच आपली व्यथा मांडणार असल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.
सरकारी आरक्षण असलेल्या जागेवर गृहप्रकल्प (बंगलो स्कीम) उभारण्याची जाहिरात करून बिल्डर विजय डांगरे याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. प्रत्यक्षात ही जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्यामुळे या जागेवर अधिकृत बांधकाम करण्याचा प्रश्नच नव्हता. हे माहीत असूनसुद्धा डांगरे याने कटकारस्थान करून, बंगल्याचे स्वप्न दाखवून अनेकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्याची बनवाबनवी उघड झाल्यानंतर पीडितांनी डांगरेला आपली रक्कम परत मागितली. तेव्हा तो त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न करू लागला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली; तक्रार देऊन अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर अखेर डांगरेविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याहीवेळी डांगरेला अटक करण्याची तसदी घेतली नाही. दलालांच्या माध्यमातून पोलिसांशी सेटिंग करून डांगरे याने पोलीस कोठडीपासून आपला बचाव करून घेतला, अशी त्याहीवेळी जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. यावेळी डांगरे याने न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात डांगरे याला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी बिल्डर डांगरे हा संबंधित पीडितांना जागा देईल किंवा त्या जागेची रक्कम देईल, या अटीवर डांगरे याला जामीन मिळाला होता. मात्र डांगरे याने पीडित व्यक्तींना जमीन दिली नाही आणि ठरल्याप्रमाणे जमिनीची रक्कमही दिली नाही. रक्कम मागायला गेलेल्या व्यक्तींना डांगरे अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्या देत होता. मारहाण करण्याचाही प्रयत्न करत होता. यासंबंधीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या. मात्र डांगरेवर माया दाखवणाºया पोलिसांनी त्या तक्रारीकडे पद्धतशीर दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्यासमोर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार आली. आम्हाला जागा मिळाली नाही, रीतसर विक्रीपत्र आणि ताबापत्र मिळाले नाही आणि न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे आमची रक्कमही आम्हाला मिळाली नाही. उलट या जागेचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना बिल्डर डांगरे याने दुसºया बिल्डरला ही जागा विकली आणि त्यांनी इथे उभी असलेली घरे अक्षरश: तोडून टाकली, हेही पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या निदर्शनास आणून दिले. मासाळ यांनी पीडितांची व्यथा ऐकून तातडीने दखल घेतली आणि हुडकेश्वर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा दाखल होऊन आता तीन दिवस झाले आहे. मात्र डांगरेला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. या प्रकरणात न्यायालयाचा उघड अवमान झाला आहे. मात्र न्यायालयाचा अवमान करूनही बिल्डर डांगरेला अटक करण्याची तसदी पोलीस घेत नाहीत. त्यामुळे पोलीस का कचरत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ गुन्हा दाखल करून पोलीस शांत का बसले, डांगरे याला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी पोलीस वाट बघत आहेत का, डांगरेला कोण वाचवत आहेत, असे प्रश्नही चर्चेला आले आहेत. दरम्यान, यामुळे पीडितांची तीव्र मानसिक कोंडी झाली आहे.
अनेक वर्षांपासून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेतल्यानंतर बिल्डर डांगरे याच्याकडून होत असलेली मानहानी असह्य झाल्यामुळे आणि पोलीसही डांगरेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना झाल्यामुळे पीडितांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे बिल्डर डांगरे याला पोलिसांनी तातडीने अटक केली नाही तर हे प्रकरण थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे नेऊन आपली व्यथा मांडण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.

खरेदीदार बिल्डरची भूमिका संशयास्पद
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना डांगरे याने ती जागा मुकुंद देशमुख नामक बिल्डरला विकून टाकली. कोणताही बिल्डर जागा विकत घेताना एकूणएक कागदपत्र बघतो. जागेचा वाद सुरू आहे का, याची खात्री करून घेतो. बिल्डर देशमुख यांनी मात्र न्यायालयात वाद सुरू असलेली जागा विकत घेतली. एवढेच नव्हे तर बिल्डरने येथे उभी असलेली पीडितांची घरे पाडून टाकली. ज्या जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे, अशी जागा बिल्डर देशमुखने विकत घेतलीच कशी, असा मुद्दा आहे. त्यामुळे खरेदीदार बिल्डरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, हा मुद्दाही स्वतंत्र तपासाचा विषय आहे.

Web Title: Why don't the police arrest builder Dangre?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.