इंदूर - बहुचर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. सोनम रघुवंशीचे कुटुंब मुलीला जामीन मिळावा यासाठी शिलांगमधील वकिलांशी संपर्क करत आहेत. दुसरीकडे सोनमने गुजरातमधील एका व्यापाराशी भेट व्हावी अशी मागणी केली आहे. गुजरातच्या ज्या व्यापाऱ्याशी सोनमला बोलायचे आहे तो गोविंदचा बिझनेस पार्टनर आहे. गोविंद सोनम रघुवंशीचा भाऊ आहे. हे सर्व दावे राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशीने केला आहे.
विपिन रघुवंशी म्हणाला की, मी सोहराला जाऊन भावाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पूजा करणार आहे. शिलांगला पोहचल्यानंतर विपिन रघुवंशीने सोनम रघुवंशी आणि तिच्या कुटुंबाबाबत अनेक दावे केलेत. राजाच्या हत्याकांडात सोनमचा भाऊ गोविंदची भूमिका आहे असं त्याने म्हटले. सोनमचा भाऊ गोविंद सातत्याने सोनम आणि राज कुशवाहला जामीन मिळावा म्हणून वकिलांशी संपर्क करत आहे. २ दिवसांपूर्वी गोविंद शिलांगला पोहचला होता. तिथूनच त्याने जामीन मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी अटकेत असलेले प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्स यांना शिलांग कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याशिवाय सोनम आणि राजला मदत केल्याने अटकेत असलेले घरमालक आणि चौकीदार यांनाही कोर्टाने दिलासा दिला आहे.
तसेच सोनम हवाला व्यवसायात गुंतली होती. तिच्या खात्यात ३०-४० लाख रूपये आहेत. गोविंदही त्याच प्रकरणात सक्रीय आहे. त्यामुळे सोनम लवकरात लवकर जेलमधून सुटावी यासाठी तो प्रयत्न करत आहे. जर सोनम दीर्घ काळ जेलमध्ये राहिली तर त्या पैशाचे नुकसान होऊ शकते ही भीती गोविंदला आहे. गोविंदही हवाला नेटवर्कशी जोडला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध नाही हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. तू माझा विश्वासघात केला असं मी स्वत: गोविंदला सांगितले असंही विपिनने दावा केला आहे. सोनमला सोडवण्यासाठी गोविंद शिलांगला वकिलांची जुळवाजुळव करत आहे.
"राजाची आत्मा आजही भटकतेय.."
मला आता सोनमला भेटायचे नाही. ती फक्त ४ दिवस माझ्या घरी राहिली होती. परंतु भावाला मारून निघून गेली. जर मी तिला भेटलो तर माझा आत्मा जळेल. मी तिला समोर पाहूनही काही करू शकत नाही त्यामुळे दूर राहिलेले चांगले. मी शिलांगच्या सोहरा भागात जात आहे जिथे राजाचा मृतदेह सापडला. त्याठिकाणी जात पूजा करून राजाच्या आत्म्याला शांतता मिळावी अशी प्रार्थना करणार आहे. त्याचे मन आजही अशांत आहे. त्याची आत्मा आजही भटकतेय अशी जाणीव होत असल्याचे विपिन रघुवंशीने म्हटलं.