तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील वानस्थलीपुरम येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे तीन दिवस उरले असतानाच एका ३२ वर्षीय तरुणाने कर्जदारांच्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत्यू होण्यापूर्वी या तरुणाने एक व्हिडीओ नोट रेकॉर्ड केला, ज्यात त्याने आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या चार आरोपींची नावे स्पष्टपणे सांगितली आहेत.
परंदा श्रीकांत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो साहेबनगर येथे राहत होता आणि रिअल इस्टेट व्यवसायात तो काम करत होता. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात श्रीकांतने हयातनगर परिसरातील चार व्यक्तींकडून सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्याला ही रक्कम वेळेत परत करता आली नाही.
लग्न मोडण्याची धमकी
श्रीकांतचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी निश्चित झाले होते आणि त्याच्या घरात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदार सत्यनारायण, सुभ्बाराव, अप्पम शेखर आणि ऐतगोनी शेखर यांनी श्रीकांतवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली.
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, या चारही व्यक्तींनी श्रीकांतला सातत्याने फोन करून धमकावले. 'पैसे परत न केल्यास आम्ही तुझे लग्न मोडून टाकू,' अशी धमकी देऊन ते त्याला ब्लॅकमेल करत होते. सामाजिक बदनामीच्या भीतीने आणि या सततच्या मानसिक त्रासामुळे श्रीकांत पूर्णपणे खचला.
व्हिडीओ नोटमध्ये आरोपींची नावे
सामाजिक बदनामीच्या भीतीने आणि अपमान टाळण्यासाठी श्रीकांतने गुरुवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ नोट रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या चारही व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितली आणि पोलिसांना विनंती केली की, 'माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या लोकांना माफ करू नका.' हा व्हिडीओ त्याने आपल्या अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्समध्येही पाठवला होता.
गुरुवारी सकाळी कुटुंबीयांना श्रीकांत न दिसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. खूप शोध घेतल्यानंतर श्रीकांतचा मृतदेह हरीहरपुरम चेरुवू कुट्टाजवळ आढळून आला. प्राथमिक तपासणीत त्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृतकाच्या व्हिडीओ नोट आणि सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी नमूद केलेल्या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.
Web Summary : Telangana groom, harassed by lenders, dies by suicide days before his wedding. He named his tormentors in a video. Police are investigating.
Web Summary : तेलंगाना में शादी से कुछ दिन पहले कर्जदारों से परेशान होकर दूल्हे ने आत्महत्या कर ली। उसने एक वीडियो में अपने उत्पीड़कों का नाम लिया। पुलिस जांच कर रही है।