मस्करीची कुस्करी! सहकाऱ्यांनी जबरदस्तीनं प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; तरुणाचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 15:05 IST2021-11-27T15:05:16+5:302021-11-27T15:05:31+5:30
पीडित तरुणावर १० दिवस सुरू होते उपचार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

मस्करीची कुस्करी! सहकाऱ्यांनी जबरदस्तीनं प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; तरुणाचा जीव गेला
कोलकाता: पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात एका ज्यूट मिल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यांनी प्रायव्हेट पार्टमधून पोटात हवा भरल्यानं कर्मचाऱ्याचा जीव गेला. सहकाऱ्यांनी मजा मस्तीत कर्मचाऱ्याच्यासोबत हे कृत्य केलं. मात्र ते जीवावर बेतलं. कर्मचाऱ्यावर रुग्णालयात १० दिवस उपचार सुरू होते. मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हुगळीतील नॉर्थब्रूक ज्यूट मिलमध्ये हा प्रकार घडला. १६ नोव्हेंबरला रहमत अली रात्री पाळीला होता. तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांनी मस्करीत त्याला पकडलं. त्यांनी अलीच्या गुदद्वारात जबरदस्तीनं पाईप टाकला आणि त्यात हवा भरू लागले. रहमत अलीनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सहकाऱ्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर रहमतची प्रकृती बिघडली. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रहमतच्या नातेवाईकांनी आधी त्याला हुगळीतील चुंचुरा इमामवाडा रुग्णालयात नेलं. मात्र प्रकृती खालावल्यानं त्याला कोलकात्यामधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र १० दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. हवेच्या दबावामुळे रहमतचं यकृत पूर्णपणे खराब झालं. त्यामुळेच रहमतचा जीव गेला.
रहमतचं वय केवळ २३ वर्षे होतं. त्याच्या कुटुंबियांनी भद्रेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शहजादा खान असं मुख्य आरोपीचं नाव आहे. तो मिलमध्ये रहमतसोबत काम करायचा. रहमतच्या कुटुंबियांनी भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मिलबाहेर आंदोलनही केलं. मात्र यावर भाष्य करण्यास मिल व्यवस्थापनानं नकार दिला.