देवदर्शनासाठी गेल्या, चोरांनी घर केले साफ; स्वयंपाकाचे सामानही पळवले
By गौरी टेंबकर | Updated: November 25, 2023 15:38 IST2023-11-25T15:37:53+5:302023-11-25T15:38:16+5:30
मुंबई: देवदर्शनासाठी दादरच्या सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरासह मुलासह गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेकडे घरफोडी करत वाण सामानासह पैसे, दागिने पळवत ...

देवदर्शनासाठी गेल्या, चोरांनी घर केले साफ; स्वयंपाकाचे सामानही पळवले
मुंबई: देवदर्शनासाठी दादरच्या सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरासह मुलासह गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेकडे घरफोडी करत वाण सामानासह पैसे, दागिने पळवत चोरांनी तिचे घर साफ केले. या विरोधात तिने गोरेगाव पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार लक्ष्मी बाकी (४३) या गोरेगाव पश्चिमच्या तीन डोंगरी परिसरात भाडेतत्त्वावर मुलगा परिंद (२६) याच्यासोबत राहतात. त्यांचा मुलगा हरियाणाच्या गुरूग्राम परिसरात नोकरीनिमित्त राहायला असून काही दिवस आई सोबत राहायला आला होता. त्यामुळे त्या १८ नोव्हेंबरला दादरच्या सिद्धिविनायक तसेच महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मुलाला घेऊन गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यातून साड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेली ६० हजारांची रोख, लॅपटॉप आणि चांदीची पैजण मिळून ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. मुख्य म्हणजे लक्ष्मी यांनी घरातील स्वयंपाकासाठी लागणारे घरगुती सामान भरून ठेवलेले डबे देखील चोरांनी रिकामी केले होते. हा सगळा प्रकार पाहिल्यावर त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचार करून झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी गोरेगाव पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.