विवेक ओबेरॉयच्या माजी व्यावसायिक भागीदाराला अटक; दीड कोटींच्या फसवणूक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 19:13 IST2023-10-02T19:13:42+5:302023-10-02T19:13:57+5:30
सिने क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरु केलेल्या आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपीमधील भागीदार होते.

विवेक ओबेरॉयच्या माजी व्यावसायिक भागीदाराला अटक; दीड कोटींच्या फसवणूक प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयचे माजी व्यावसायिक भागीदार आणि निर्माता संजय सहा याला दीड कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरु केलेल्या आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपीमधील भागीदार असलेल्या सहा आणि अन्य आरोपींनी दीड कोटी रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी विवेक ओबेरॉय यांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ओबेरॉय यांच्या ओबेरॉय मेगा इंटरटेमेंट फर्मचे लेखापाल देवेन जवाहरलाल बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी - संजय सहा, नंदिता सहा, राधिका नंदा आणि इतरांविरुद्ध जुलैमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑर्गनिक एल एलपीची स्थापना झाली. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या फर्मचे भागीदार आहे. ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिने क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विवेक यांची संजय सहा यांच्याशी ओळख झाली. सहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय सहा यांच्यासह, नंदिता सहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या फर्ममध्ये भागीदार बनवले.
पुढे त्यांनी, आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपी हे फर्म स्थापन केली. यामध्ये विवेक ओबेरॉय यांना वैयक्तिक खात्यातून तसेच ओबेराय मेगा इंटरटेनमेंट एल एल पी या फर्ममधून एकूण ९५,७२,८१४ ही रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वेळोवेल्ली विविध कारणे पुढे करत, आनंदीता फर्मला कुठलीही माहिती विवेक यांच्या १,५५,७२,८१४ रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जुलैमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, संजय सहा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.