विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:47 IST2025-12-16T20:45:59+5:302025-12-16T20:47:08+5:30
दाऊद इब्राहिम याचा हस्तक म्हणून सुभाषसिंह ठाकूर ओळखला जातो

विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर ह्याला मीरा भाईंदर गुन्हे शाखेने विरार हत्याकांड प्रकरणी फतेहगढ कारागृहातून ताब्यात घेतले असून मंगळवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सुभाषसिंह ह्याच्या चौकशीतून आयुक्तलयातील जमीन व्यवहार व खंडणी वसुली आणि अन्य गुन्हे देखील उघडकीस यावेत अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. भारतासह परदेशातील गुन्हेगारी कारवाया आणि कुख्यात देशद्रोही गुंड दाऊद इब्राहिम ह्याचा हस्तक म्हणून सुभाषसिंह ठाकूर ओळखला जातो. त्याच्यावर असंख्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जेजे हत्याकांडचा मुख्य आरोपी असलेल्या सुभाषसिंह ह्याला विशेष टाडा न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलीआहे. तो सध्या उत्तरप्रदेशच्या फतेहगढ कारागृहात शिक्षा भोगत आहे. ७४ वर्षांच्या या दहशत माजवणाऱ्या गुंडाला अनेक गंभीर आजार असून चालताही येत नाही.
विरारच्या मनवेल पाडा ९० फुटी मार्गावर २६ फेब्रुवारी २०२२ रोजी समरजित उर्फ समय विक्रमसिंग चौहान (वय ३०) यांची जमीन व बांधकाम व्यवसाय वादातून हत्या करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी १३ जणांना अटक केली होती. त्यातील दोघांना दोषमुक्त केले गेले असून बाकीचे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी खाली कारागृहात आहेत. या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक राहुल दुबे व साथीदारांनी चौहान ह्याच्या हत्येची सुपारी सुभाषसिंह ह्याला दिली होती. जन्मठेप भोगत असताना त्याला तो उपचारासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे आरोपींनी भेट घेतली होती. चौहान हत्याकांड मध्ये सुभाषसिंह याच्या बद्दल पुरावे मिळाल्या नंतर पोलिसांनी त्याला पण आरोपी केले होते. २०२२ साली त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता प्रकृती खराब असल्याने त्यावेळी ताबा मिळाला नव्हता.
पोलिसांचा पाठपुरावा सुरु होता व कारागृहातील डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या नंतर सदर गुन्ह्याचा तपास करणारे गुन्हे प्रकटीकरण शाखा -१ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख सह उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार मनोहर तावरे यांनी फतेहगढ कारागृहातून सुभाषसिंह ह्याचा ताबा घेतला. विमानाने मंगळवारी पहाटे मीरा भाईंदर मध्ये आणल्या नंतर पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली.
ठाणे न्यायालयात त्याला हजर केले असता विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी त्याची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने २२ डिसेम्बर पर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे. सुभाषसिंह हा गुन्हे शाखेच्या ताब्यात असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बडाख हे चौकशी करत आहेत. मीरारोडच्या बंटी प्रधान हत्याकांड सह मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील अनेक जमीन व बांधकाम व्यवसाय प्रकरणात सुभाषसिंह ठाकूर याने खंडणी वसुली केल्याची आणि त्याचे हस्तक येथे असल्याची चर्चा आहे.