बदला म्हणून वृद्ध महिलेला विवस्त्र करून Video बनवला; औरंगाबादमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 05:55 IST2022-12-06T05:53:28+5:302022-12-06T05:55:30+5:30
नातीला पळवून नेल्याचा ठेवला आराेप, विवस्त्र करून चित्रीकरण करीत वृद्धेला मारहाण

बदला म्हणून वृद्ध महिलेला विवस्त्र करून Video बनवला; औरंगाबादमधील संतापजनक घटना
गंगापूर (जि. औरंगाबाद) : आमच्या नातीला तुझ्या नातवाने पळवून नेले, असा आरोप करीत गंगापूर येथील अंतापूर शिवारात राहणाऱ्या वृद्ध महिलेला तालुक्यातील ओझर येथील तिघांनी घरी नेऊन विवस्त्र करीत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. याप्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी महिलेच्या नातवावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तो सध्या फरार आहे. गंगापूर तालुक्यातील ओझर येथे राहणारे आरोपी विवेक उर्फ चावल्या पिंपळे, भावड्या पिंपळे व नीतूबाई पिंपळे या सर्वांनी शनिवारी दुपारी वृद्ध महिलेच्या घरी जाऊन तुझ्या नातवाने आमच्या मुलीला पळवून नेले, असा आरोप केला व नातवाला शोधायला जायचे आहे, असे सांगून महिलेला गाडीत बसवले. त्यानंतर ओझर या ठिकाणी घरी नेऊन विवस्त्र करून मारहाण केली व याचा व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. तसेच तिला दिवसभर डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडितेने नातेवाइकांना सोबत घेऊन गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरोधात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी भावड्या पिंपळे, नीतूबाई पिंपळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य एक आरोपी फरार आहे.
बदला म्हणून बनविला व्हिडीओ
फिर्यादी महिलेच्या नातवाने आरोपींच्या घरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या नातवाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ फिर्यादी महिलेच्या नातवाने बनविला, असा आरोप सध्या गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी केला होता. त्याचा बदला म्हणून फिर्यादी महिलेला डांबून तिला विवस्त्र करून मारहाण करतानाचा व्हिडीओ आरोपींनी बनविला असल्याचे म्हटले जात आहे.