नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्ली भागातील महिपालपूर उड्डाणपुलाजवळ एका 24 वर्षीय तरुणाने हॉर्न वाजवण्यास रोखल्यामुळे सुरक्षा रक्षकाला महिंद्रा थारखाली चिरडले. रविवारी(दि.4) ही धक्कादायक घटना घडली असून, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, वसंत कुंज पोलिस ठाण्याने सहा तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या.
पीडित राजीव कुमार हा फायरवॉल सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याने पोलिसांना सांगितले की, रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना त्याने एका थार चालकाला अनावश्यक हॉर्न वाजवण्यापासून रोखले होते. हॉर्न वाजवण्यास रोखल्यामुळे तरुणाला राग अनावर झाला अन् त्याने जाणूनबुजून त्याच्या थार वाहनाने राजीव कुमारला चिरडले. या घटनेत राजीव यांचे दोन्ही पायांचे हाड मोडले.
घटनेची माहिती मिळताच वसंत कुंज दक्षिण पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि हिट अँड रनचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्याच्या आधारे काळ्या रंगाची महिंद्रा थार ओळखली गेली. गाडी मालकाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रंगपुरी येथील रहिवासी असलेल्या आरोपी विजय उर्फ लाला याला अटक केली आणि त्याची महिंद्रा थार कार जप्त केली.