Uttarakhand Crime: उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये गेल्या वर्षी एका हत्येच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. धारचुलामध्ये नातेवाईकांना भेटायला आलेल्या एका अल्पवयीन मुलाची दुसऱ्या अल्पवयीन मुलाने चाकूने गळा चिरून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर, आरोपी नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने काली नदीत उडी मारली. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी नदीकाठी मोठी शोध मोहीम देखील राबवली होती. मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर आता आरोपी स्वतःहून ४३६ दिवसांनी समोर आला आहे.
धारचुलाच्या छलमा छिलासन येथील रहिवासी १७ वर्षीय मुलगा अनुज सिस्टोल हा देहरादूनमध्ये काम करायचा. १५ जून २०२४ रोजी तो धारचुलाला आला होता आणि गरब्याल खेडा येथील त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. आरोपी मुलगा घरी आला आणि त्याने अनुज सिस्टोलच्या मानेवर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केला. ज्या वेळी ही घटना घडली, त्यावेळी अनुज सिस्टोलची मावशी दुकानात गेली होती. ओरडण्याचा आवाज ऐकून ती धावत आली. मावशीसह आजूबाजूच्या लोकांना अनुजला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर आरोपी तिथून पळून गेला. तो नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी तो काली नदीच्या काठावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खोटिला येथे पोहोचला. तिथून त्याने नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात काली नदीत उडी मारली, परंतु त्यानंतर तो दिसला नाही. आरोपीचे नाव सुरेंद्र राम होते. तो धारचुलाचा रहिवासी आहे आणि तो अल्पवयीन आहे. त्यानंतर एसडीआरएफ, एसओजी आणि धारचुला पोलिसांनी काली नदी आणि आसपास हल्लेखोराचा शोध घेतला होता पण तो सापडला नाही.
मात्र आता अनुजची हत्या करणाऱ्या सुरेंद्र रामला पोलिसांनी ४३६ दिवसांनंतर अटक केली आहे. अनुजची हत्या केल्यानंतर त्याने काली नदीत उडी मारल्याने पोलिसांनीच नव्हे तर लोकांनीही त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असं मानलं होतं. आरोपी सुरेंद्र राम उर्फ सुक्कूने अनुजच्या मानेवर वार केला होता. बराच शोध घेतल्यानंतरही सुरेंद्र राम न सापडल्याने खूनाचा खटला बंद करण्यात आला आणि कायदेशीर प्रक्रिया थांबली. काही दिवस चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण मागे पडले.
दुसरीकडे, अजुनच्या वडिलांनीही आरोप केला सुरेंद्र नेपाळमध्ये आहे आणि तो मुक्तपणे फिरत आहे. पोलिसांनी सांगितलेली माहिती खोटी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात महिनोनमहिने प्रगती न झाल्याने जनतेचा रोष वाढत गेला. जूनमध्ये, गौरव सेनानी कल्याण संघटना आणि अनेक कामगार संघटनांसह स्थानिक संघटनांनी धारचुलामध्ये आंदोलने केली. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करून फरार आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, यानंतर पोलिसांनी लवकरच आरोपीच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच, आरोपी सुरेंद्रने आत्मसमर्पण केले. आरोपीला जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी आरोपी सुरेंद्रला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.