उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकडला गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची तिच्याच शेजाऱ्याने निर्घृण हत्या केली. नीतू देवी (२८) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपीने नीतूला आधी दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली, तिच्या डोक्यावर वार केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवरही गंभीर जखमा केल्या. या भीषण हल्ल्यात नीतूचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?मंगळवारी सकाळी पोलिसांना एकडला गावाजवळच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. एसपी अनुप सिंह यांनी तातडीने फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवल्यावर ती नीतू देवी असल्याचे निष्पन्न झाले. तपासात समोर आलं की, सोमवारी संध्याकाळी नीतू, तिचा पती आणि त्यांचा शेजारी सर्वेश निषाद यांनी एकत्र दारू प्यायली होती. त्यानंतर नीतू सर्वेशसोबत भाजी घेण्यासाठी किशनपूर बाजारपेठेत गेली होती.
सकाळी सर्वेशनेच पोलिसांना जंगलात मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या सर्वेशने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.
खुनामागचं भयानक कारणसर्वेशने पोलिसांना सांगितलं की, किशनपूरमधून भाजीपाला, मांस आणि कोल्डड्रिंक्स घेतल्यानंतर ते दोघे दमहा नाल्याजवळील जंगलात पुन्हा दारू प्यायले. तिथे दारूच्या नशेत असतानाच त्याने नीतूवर हल्ला केला. सर्वेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याला संशय होता की नीतूनेच त्याच्या वडिलांना विष देऊन मारले आहे. याच सूडाच्या भावनेतून त्याने नीतूची हत्या केल्याचं कबूल केलं.
सर्वेशने पोलिसांना सांगितलं की, नीतू दारूच्या नशेत पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्या डोक्यावर हल्ला केला. ती खाली पडल्यावर त्याने तिच्या गुप्तांगांनाही गंभीर इजा केली. पोलिसांच्या अंदाजानुसार, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे नीतूचा मृत्यू झाला असावा, मात्र शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
पोलिसांची कारवाईएसपी अनुप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतूच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्वेश निषादविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेतील इतर पैलूंवरही पोलीस तपास करत आहेत.