Crime News: प्रेमात अडचण ठरणाऱ्या वडिलांना आणि भावाला बाजूला काढण्यासाठी मुलीने तिच्या प्रियकरासह हादरवणार कृत्य केल्याचं समोर आलं आहे. स्वाती आणि तिचा प्रियकर मनोज यांनी त्यांच्या वडिलांना आणि दोन भावांना, जे त्यांच्या प्रेमविवाहात अडथळा आणत होते, त्यांना अडकवण्यासाठी एक भयानक कट रचला. सुरुवातीला स्वातीची मनोजने तिच्या वडिलांना आणि भावांना कायमचे संपवून टाकावे अशी इच्छा होती. पण जेव्हा मनोजने त्यांची हत्या करण्यास नकार दिला तेव्हा स्वातीने दुसऱ्या व्यक्तीचा खून करण्यास सांगितले आणि वडिलांना आणि भावांना गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. स्वातीने मनोजसोबत लग्न करण्यासाठी आखलेली योजना ऐकून पोलिसांनी धक्का बसला. स्वातीच्या आणि मनोजच्या प्रेमात एका निष्पाप माणसाची हत्या झाली. क्राइम पेट्रोल पाहून स्वातीने हे कथानक रचले होते. मनोजने त्याच्या चुलत भावासोबत मिळून निष्पाप योगेशला विटेने वार करून ठार मारले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि आरोपी मनोज असल्याचे समोर आलं. रविवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात मनोजला अटक झाल्यानंतर हे रहस्य उलगडले. स्वातीनेही तिचा गुन्हा कबूल केला.
स्वातीचे वडील शोभाराम आणि तिचा भाऊ गौरव आणि कपिल हे तिच्या प्रेम विवाहाच्या विरोधात होते. लग्नात अडथळे निर्माण करणाऱ्या वडील आणि भावांना संपवण्यासाठी स्वातीने मनोजकडे तगादा लावला होता. पण मनोजने क्राइम पेट्रोल पाहून स्वातीच्या घरच्यांना अडकवण्यासाठी एकाची हत्या करण्याचे ठरवलं. मनोजने त्याचा चुलत भाऊ मनजीतसोबत मिळून त्याच गावातील रहिवासी योगेशला झोपेच्या गोळ्या मिसळलेली दारू दिली. त्यानंतर त्यांनी योगेशच्या डोक्या विटेने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने योगेशच्या मोबाईलवरून पोलिसांना फोन करून शोभाराम, गौरव आणि कपिलचे नाव घेत हे लोक मला मारत आहेत असं सांगितले. त्यानंतर योगेशचा मृतदेह झुडपात फेकून दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तपास सुरु केला असता योगेशचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सुरुवातीला त्या फोन कॉलच्या आधारे मुलीच्या वडिलांची आणि भावाची नावे नोंदवून घेतली. पण तपासादरम्यान, जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले तेव्हा प्रकरण संशयास्पद बनले. कॉल डिटेल्स तपासल्यानंतर पोलिसांना एक संशयास्पद नंबर सापडला. पुढील तपासात या संपूर्ण कटामागील खरे गुन्हेगार मनोज आणि त्याचा भाऊ मनजीत असल्याचे समोर आलं.
दरम्यान, रविवारी रात्री पोलिसांनी मनोजला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याच्या उजव्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करत त्याची चौकशी केली. त्यानंतर स्वातीलाही ताब्यात घेण्यात आलं.