UP Crime: जिल्ह्यातील जैतीपूर भागातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे अवघ्या १० दिवसांच्या निरागस बालिकेला जिवंत गाडण्यात आले. मात्र तिच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी वेळेत तिला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला हायपोथर्मिया झाला होता, पण सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी बाळाच्या कुटुंबाचा व दोषींचा शोध सुरू केला आहे.
चिमुकलीला जिवंत गाडले
शाहजहाँपूर जिल्ह्यातील गौहरवार गावाजवळच्या शेतात ही घटना घडली. दहा दिवसांच्या चिमुकलीला मातीत गाडण्यात आले होते. तिच्या रडण्याचे आवाज ऐकून जनावरे चारत असलेले ग्रामस्थ तिकडे धावले. मातीतून एका बाळाचा हात बाहेर आलेला दिसला. हे दृश्य पाहून ग्रामस्थांनी तात्काळ त्या बाळाला बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली.
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बाळाला सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) जैतीपूर येथे दाखल केले. प्रभारी डॉक्टर नितीन सिंह यांनी सांगितले की, सकाळी साडेदहा वाजता बाळाला आणण्यात आले. तिच्या शरीरावर माती लागलेली होती. तिच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच, पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
अजून ओळख पटलेली नाही
बाळाची ओळख किंवा तिच्या कुटुंबाविषयी काहीही माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. जैतीपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, नेमके कोणी व का या चिमुकलीला जिवंतपणी गाडले, याचा तपास सुरू आहे. या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.