UP Crime:उत्तर प्रदेशातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. फोनवर बोलल्याबद्दल पतीने विचारपूस केल्यानंतर पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याला संपवलं. पाच दिवसांपासून पतीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. मृताच्या पत्नीने एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होतं. पतीला त्याबाबत कळताच त्याने याबाबत विचारणा केली. मात्र पत्नीने तिच्या कुटुंबासह आणि प्रियकारासह मिळून कावड यात्रेत गेलेल्या पतीला पेट्रोल टाकून जाळून मारुन टाकलं.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात राहणाऱ्या सनीने पत्नीला दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलण्यापासून रोखलं होतं. हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा ठरला. सनीची पत्नी अंकिताचे अय्युब नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. अनेक वेळा सनीने त्याच्या पत्नीला फोनवर बोलताना पकडलं होतं. यावरुन दोघांमध्ये वारंवार भांडणे देखील होत होती. या भांडणानंतर अंकिता तिच्या माहेरी गेली. पण पुढे जे घडले त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं.
२२ जुलै रोजी सनी रमाला परिसरातील कंडारा गावातून कावड घेण्यासाठी हरिद्वारला निघाला होता. पण दोघाट परिसरातील कावड मार्गावर त्याचा मृत्यू वाट पाहत होता. सनीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो दोघाट परिसरातील कानवड मार्गावर पोहोचला तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी आणि अयुबचे लोक तिथे पोहोचले आणि त्याला सोबत घेऊन गेले. सनीला त्याची पत्नी अंकिता, तिची सासू,अंकिताचा काका आणि तिचा प्रियकर अय्युब यांनी जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर अंकितासह सर्वांच्या डोळ्यासमोर अय्युबने सनीवर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले.
घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सनीला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्याला मेरठ आणि नंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सनीचे शरीर ८० टक्के भाजले होते. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सनीचा मृत्यू झाला. त्यानंतर सनीचा मृतदेह गावात पोहोचला तेव्हा संतापाची लाट उसळली. कुटुंबीय मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरु केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी सनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.