MP Crime: मध्य प्रदेशात प्रेमाच्या नावाखाली विकृत मानसिकतेची घटना समोर आली आहे. उज्जैनमध्ये एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण आपल्या विवाहित शेजारणीच्या घराबाहेरून तिचे अंतर्वस्त्र चोरत असे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या 'सायको' प्रियकराचा पर्दाफाश केला आहे.
सीसीटीव्हीने उघड केला 'तो' कारनामा
उज्जैनच्या चिमनगंज मंडी परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून एका महिलेचे घराबाहेर वाळत घातलेले कपडे चोरीला जात होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे कुटुंबीयांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. काही दिवसांपूर्वी जेव्हा पुन्हा कपडे चोरीला गेले, तेव्हा सीसीटीव्ही तपासण्यात आला. त्यामध्ये एक तरुण रात्रीच्या अंधारात हळूच येतो, इकडे-तिकडे पाहतो आणि दोरीवर वाळत घातलेले केवळ महिलेचे अंतर्वस्त्र चोरून खिशात घालून पसार होतो, हे स्पष्टपणे दिसले.
छातीवर त्या महिलेच्या नावाचा टॅटू!
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अंकित उर्फ अमित मालवीय (२५) याला अटक केली. अटकेनंतर जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने दिलेली कबुली ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आरोपीने सांगितले की, तो शेजारी राहणाऱ्या त्या विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. त्याच्या या वेडापायी त्याने स्वतःच्या छातीवर त्या महिलेच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला आहे. यामुळेच तो रात्रीच्या वेळी तिच्या घराबाहेरून कपडे चोरत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करतो. आरोपीचा साखरपुडा झाला असून अद्याप लग्न झालेले नाही. आरोपीचे वर्तन एखाद्या सायको व्यक्तीप्रमाणे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ज्या महिलेबाबत तो हे दावे करत होता, त्या महिलेने स्पष्ट केले की तिचे त्याच्याशी कधीही बोलणे झालेले नाही किंवा तिला या प्रकाराबद्दल काहीही कल्पना नव्हती.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी आरोपी अमित मालवीय विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीच्या कुटुंबीयांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली असून त्याला पुन्हा अशी कृती न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा असे घडल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दुसरीकडे. या विचित्र प्रकारामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Web Summary : In Ujjain, a 25-year-old man was arrested for stealing his married neighbor's lingerie. He confessed to being obsessively in love with her, even tattooing her name on his chest. The crime was revealed through CCTV footage.
Web Summary : उज्जैन में एक 25 वर्षीय युवक को विवाहित पड़ोसी के अंतर्वस्त्र चुराने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने कबूल किया कि वह उससे एकतरफा प्यार करता है और उसने अपनी छाती पर उसका नाम भी गुदवाया है। सीसीटीवी फुटेज से अपराध का खुलासा हुआ।