ठाकरे गट-शिंदे गट पालघरमध्ये भिडले; पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण काहीसे निवळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:19 IST2024-01-12T14:18:22+5:302024-01-12T14:19:53+5:30
शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने ‘गद्दार, गद्दार’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर संघर्षाचे वातावरण

ठाकरे गट-शिंदे गट पालघरमध्ये भिडले; पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण काहीसे निवळले
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: शिवसेना कुणाची? या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची’ असल्याचा निकाल दिला. पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ गुरुवारी विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या शिंदे गटासमोर उद्धव ठाकरे गटाने येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने ‘गद्दार, गद्दार’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पालघर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण काहीसे निवळले.
पालघर रेल्वे स्थानकाकडून हुतात्मा स्तंभाजवळ जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गट आल्यावर आधीच जमलेल्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विकास मोरे, राजेंद्र पाटील, सुनील महेंद्रीकर, रॉकी तांडेल, अतुल पाठक आदींनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले.
सत्याचा विजय असल्याचे शिंदे गटाने सांगून ‘शिंदे साहेब आगे बढो’ अशा घोषणा उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, कुंदन संखे, संजय चौधरी, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, रंजना म्हसकर, नीलम संखे आदींसह कार्यकर्त्यांनी दिल्या.