नागपुरात साडेतीन तासात दोघांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:46 IST2020-06-04T22:43:18+5:302020-06-04T22:46:02+5:30
यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या.

नागपुरात साडेतीन तासात दोघांची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या.
प्रतापनगरात दुपारी एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. तर हुडकेश्वरमध्ये सायंकाळी दुसऱ्या एका तरुणाची हत्या झाली. अवघ्या साडेतीन तासातील या दोन हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र थरार निर्माण झाला आहे.
कार्तिक लक्ष्मण साळवे (वय २४, रा. गोपाल नगर) असे प्रतापनगरात हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या प्रेयसीच्या भावाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्याची निर्घृण हत्या केली. कार्तिक साळवे हा एका स्थानिक वाहिनीमध्ये कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून काम करीत होता. त्याचे प्रताप नगरातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. ते उघड झाल्यामुळे तिचा भाऊ आरोपी विक्की नेपाळी याच्यासोबत यापूर्वी त्याचे भांडणही झाले होते. नेपाळीने कार्तिकला तिच्यापासून दूर राहण्याचे सांगून गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. मात्र कार्तिकच्या प्रेम प्रकरणात अंतर आले नाही. त्याच्या प्रेयसीसोबत भेटीगाठी सुरूच असल्याचे ध्यानात आल्यामुळे नेपाळी संतापला होता. त्याने कार्तिक साळवेचा गेम करण्याचा कट रचला.
गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास कार्तिक दुचाकीने गोपाल नगरातून जात असताना दोन आरोपी एका दुचाकीवर बसून आले. मागे बसलेला आरोपी नेपाळीच्या हातात लोखंडी रॉड होता. धावत्या गाडीवरून त्याने कार्तिकच्या डोक्यावर जोरदार फटका हाणला. त्यामुळे कार्तिक दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यावर पुन्हा रॉडचे अनेक फटके मारले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. आजूबाजूच्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी आरोपी नेपाळी ऊर्फ विक्रम हुकुम बहादुर कार्की (वय २७, रा. दाते ले-आउट, एमआयडीसी) आणि रामू भीमबहादुर गोदामे (वय २९, रा. प्रसाद नगर, जयताळा, एमआयडीसी) या दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना विचारपूस तसेच अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेची चर्चा सुरू असतानाच सायंकाळी ६ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोळे सभागृहाच्या बाजूला वैभव मुरते (वय ३०) या तरुणाची पाच ते सात गुंडांनी भीषण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतवैभव तवेरा चालवायचा. त्याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून राजीव गांधी योजनेंतर्गतही तो काम करायचा. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तो पडोळे सभागृहाजवळून जात असताना त्याच्या डोळ्यात गुंडाच्या एका टोळक्याने मिरची पावडर झोकले. वैभव हतबल झाल्यानंतर त्याच्यावर घातक शस्त्राचे अनेक घाव घालून गुंडांनी त्याची हत्या केली आणि पळून गेले. भररस्त्यावर झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच हुडकेश्वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे आणि या हत्येच्या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे ठाणेदार वाघमारे यांनी सांगितले.
यशोधरानगरात आरोपी गजाआड
यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुंड अनुज ऊर्फ अनू ठाकूर सुदाम बघेल (वय २४) याची कुख्यात उस्मान अली, त्याचा भाऊ मेहबूब अली आणि कलिम ऊर्फ मखन अन्सारी या तिघांनी यशोधरानगरातील फुकटनगरात बुधवारी रात्री १०च्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. या हत्येचा तपास करून पोलिसांनी उपरोक्त तिघांना गुरुवारी अटक केली.