धक्कादायक! लुडोमध्ये हरलेले ५० रुपये न दिल्यानं दोन मित्रांकडून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 16:21 IST2020-07-19T16:18:25+5:302020-07-19T16:21:35+5:30
चार दिवसांनंतर तरुणाचा मृतदेह सापडला; आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

धक्कादायक! लुडोमध्ये हरलेले ५० रुपये न दिल्यानं दोन मित्रांकडून तरुणाची हत्या
अमृतसर: लुडोमध्ये हरलेले ५० रुपये न दिल्यानं दोन मित्रांनी त्यांच्याच साथीदाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला. आरोपी त्यांच्या मित्राला दारू पिण्याच्या बहाण्यानं घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यांनी मित्राचा मृतदेह घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात फेकला.
मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना १४ जुलैला घडली. मात्र पोलिसांना ४ दिवसांनंतर मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. सुखजिंदर सिंह १४ जुलैला त्याचे मित्र विशालदीप सिंह आणि मनीसोबत एका ई-रिक्षामध्ये बसून लुडो खेळत होता, अशी माहिती त्याचा भाऊ अवतार सिंहनं दिली. सुखजिंदर सिंह लुडोमध्ये ५० रुपये हरला. त्यानं पैसे न दिल्यानं तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विशालदीप आणि मनीनं सुखजिंदरला मारहाण केली. त्यामुळे सुखजिंदरनं विशालदीपच्या ई-रिक्षाची काच फोडली. त्यानंतर त्यांच्यातला वाद मिटला. यानंतर आरोपीचे आणखी काही मित्र तिथे आले. ते सुखजिंदरला दारू पिण्याच्या बहाण्यानं घेऊन गेले, अशी माहिती अवतार सिंहनं दिली.
सुखजिंदर घरी न परतल्यानं अवतार सिंहनं आसपासच्या भागात असणारे सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी सुखजिंदरला जबरदस्तीनं ई-रिक्षामध्ये बसवून नेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर अवतारनं त्याचा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याच रात्री गुरू तेग बहादूर नगरजवळ असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातून सुखजिंदरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. केवळ ५० रुपयांसाठी हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलीस चौकशीत दिली.