सोलापूर - लग्न कार्यासाठी आलेल्या ३४ वर्षीय महिलेला तुला घरी सोडतो असे म्हणून दोघांनी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी महिलेवर जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुरेश माळी आणि संतोष भानवसे या दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, पीडित महिला लग्न कार्यासाठी तिच्या पतीसोबत आली होती. तिचे पती दारूच्या नशेत असल्याने आरोपी यांनी फिर्यादी व तिच्या पतीला वऱ्हाडाच्या गाडीत बसवून पाठवले. त्यानंतर रात्री ११.३०च्या सुमारास त्यांनी महिलेला तुला घरी सोडतो असे सांगून कारमध्ये बसवले. मात्र घरी न नेता ते तिला कुर्डूवाडी रोडवरील एका लॉजवर घेऊन गेले. लॉजवर पोहचल्यावर महिलेला संशय आल्याने तिने विरोध केला. त्यामुळे आरोपीने तिला धमकावत मारहाण करत अत्याचार केले.
या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. बार्शी कोर्टात आरोपींना हजर केले असता त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे हे करत आहेत. महिलेवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. २ दिवस उपचार झाल्यानंतर २४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी तिला डिस्चार्ज देण्यात आला. उपचारानंतर आरोपींनी महिलेला तुळजापूर रोडवर नेले. त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, आरोपींनी दिलेल्या भीतीपोटी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. मात्र अखेर महिलेने धैर्य एकवटून डिसेंबर महिन्यात घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंत २३ मार्च रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.