कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 22:50 IST2021-12-27T22:50:08+5:302021-12-27T22:50:55+5:30
सिन्नर : तालुक्यातील दातली येथील शेतकरी आनंदा गबाजी भाबड यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला
सिन्नर : तालुक्यातील दातली येथील शेतकरी आनंदा गबाजी भाबड यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
रविवारी (दि.२६) भाबड यांनी दिवसभर शेतात काम करून दुसऱ्या दिवशी सायखेडा मार्केटला कांदा नेण्यासाठी भरून ठेवला होता. रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास घरासमोर लावलेला निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १५ बी डब्लू ४११३) व ट्रॉली (क्रमांक एम एच १५ सीएस २९९१) कांद्याने पूर्ण भरलेल्या ट्रॉलीसहित चोरीला गेला. पहाटे साडेतीन वाजता नैसर्गिक विधीसाठी बाहेर आल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.
दरम्यान, त्यांनी घराच्या आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना घरापासून वडांगळी रस्त्याने मानमोडा फाट्यापर्यंत ट्रॉलीमधील कांदे रस्त्यावर पडलेले दिसले. त्यानुसार त्यांनी तिथपर्यंत मागोवा घेत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना सव्वादोन वाजता ट्रॅक्टर पंचाळे गावातून कोपरगावकडे जात असताना दिसून आला.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आनंदा भाबड यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील तपास करत आहे. ट्रॅक्टरबाबत काही माहिती मिळाल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.