१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:35 IST2025-09-27T06:34:23+5:302025-09-27T06:35:07+5:30
गेल्या सात महिन्यांत हुंड्यासाठी मानसिक छळाचे ३०५ गुन्हे नोंद झाले असून, यापैकी २७१ गुन्ह्यांची उकल झाल्याचे समोर आले आहे.

AI Generated Image
मुंबई - सगळीकडे नवरात्रौत्सव सुरू असताना माहीममध्ये विवाहित तरुणीचा सहा कोटींच्या हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी अनन्वित मानसिक, शारीरिक छळ केला. इतकेच नाही, तर हेतुपुरस्सर मारहाण करून गर्भपात घडवून आणला.
या घटनेने मायानगरीतही हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. गेल्या सात महिन्यांत हुंड्यासाठी मानसिक छळाचे ३०५ गुन्हे नोंद झाले असून, यापैकी २७१ गुन्ह्यांची उकल झाल्याचे समोर आले आहे.
९ जणींचा बळी
हुंड्यासाठी ४ जणींचा बळी गेला आहे, तर ५ जणींनी आयुष्य संपविले. यामध्ये सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात आली आहे.
बदनामीच्या भीतीने माहेरचे तोंड बंद
अनेक जण बदनामीच्या भीतीने आपल्या मुलीला मानसिक शारीरिक छळ सुरू असतानाही सांभाळून घेण्यास सांगतात. सासरच्या मागण्याही ते वेळोवेळी पूर्ण करतात. मात्र, यातून मुली टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही काही प्रकरणांतून दिसून आले आहे.
२१ लाखांची राेकड, ‘बीएमडब्ल्यू’ची मागणी
माहीममधील तक्रारदार तरुणीच्या १८ सप्टेंबरच्या तक्रारीनुसार गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात माहीम येथे राहणाऱ्या लाकडाचा व्यापार करणाऱ्या तरुणासोबत तिचे लग्न झाले. सासरच्या मंडळींनी हुंड्यात २१ लाख रुपये आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. वडिलांनी ११ लाख रुपये, १६५ तोळे सोने, दोन किलो चांदी आणि एक कार हुंडा म्हणून दिली, तसेच इस्लाम जीमखाना येथे तब्बल तीन कोटी रुपये खर्चून थाटामाटात लग्न लावून दिले. एवढे करूनही सासरच्या मंडळींनी सहा कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करीत मारहाण केली. यामध्ये विवाहितेचा गर्भपात झाला.