शिक्षकांनी छळले; विद्यार्थिनीची आत्महत्या, संतप्त जमावाने शाळेतील २० बस पेटवल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:13 IST2022-07-18T08:12:43+5:302022-07-18T08:13:16+5:30
मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ७० जणांना अटक केली असून, शाळेच्या व्यवस्थापनातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिक्षकांनी छळले; विद्यार्थिनीची आत्महत्या, संतप्त जमावाने शाळेतील २० बस पेटवल्या!
कल्लाकुरुची : तमिळनाडूतील कल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या जमावाने रविवारी तिच्या शाळेत घुसून तेथील मालमत्तेची नासधूस केली. शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या २० बस, तसेच पोलिसांच्या एका वाहनाला जमावाने आग लावली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. या हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी दोनदा हवेत गोळीबार केला.
मुलीचा छळ करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त जमावाने मागणी केली. तसेच जमावाने रास्ता रोको आंदोलनही केले. या लोकांनी शांतता पाळावी, असे आवाहन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.
नेमके काय झाले?
चिन्ना सालेम भागात एका खासगी शाळेत बारावी इयत्तेत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने १२ जुलैला हॉस्टेलच्या सर्वांत वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. १३ जुलैला सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. या मुलीला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अनेक गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे शवचिकित्सा अहवालात म्हटले आहे.
७० जण अटकेत
मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ७० जणांना अटक केली असून, शाळेच्या व्यवस्थापनातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचारामध्ये ५२ पोलीस जखमी झाले आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?
आत्महत्या केलेल्या मुलीने त्याआधी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये मला दोन शिक्षक, काही विद्यार्थ्यांनी छळले, अभ्यासात अडथळे आणले, असा आरोप केला होता. या सर्व प्रकाराची इतर शिक्षकांनाही कल्पना होती, असे या मुलीने त्या चिठ्ठीत लिहिले होते. (वृत्तसंस्था)