पोलिसांना आव्हान देणारा ‘टायगर’ अखेर गजाआड; अंबरनाथमधील गोळीबार प्रकरण कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:05 IST2025-04-24T06:04:48+5:302025-04-24T06:05:10+5:30
पोलिसांनी तांत्रिक तपास करत जितेंद्र याचा माग काढला आणि अखेर लोणावळ्याहून त्याला बेड्या ठोकत अंबरनाथला आणले

पोलिसांना आव्हान देणारा ‘टायगर’ अखेर गजाआड; अंबरनाथमधील गोळीबार प्रकरण कारवाई
अंबरनाथ - येथील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरील गोळीबारप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी जितेंद्र पवार ऊर्फ टायगर याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्यरात्री लोणावळ्याहून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जितेंद्र हा गोळीबार झाल्यानंतर फरार झाला होता. तर त्याचा साथीदार खालीद शेख याला अटक करत गुन्ह्यात वापरलेली गाडीही पोलिसांनी हस्तगत केली होती. फरार असलेल्या टायगरने फेसबुकवर स्टोरी टाकत मला शोधणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस, असे आव्हान पोलिसांना दिले होते. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत जितेंद्र याचा माग काढला आणि अखेर लोणावळ्याहून त्याला बेड्या ठोकत अंबरनाथला आणले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
गोळीबारानंतर जितेंद्र थेट कोल्हापूरला निघून गेला
गोळीबाराची घटना घडल्यानंतर आरोपी हा थेट कोल्हापूरला निघून गेला होता. त्यानंतर त्याने कोल्हापूर बसडेपोतील फ्री वाय-फायचा वापर करून सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्याचा सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांनी ट्रॅक करत त्याने कोल्हापूर येथील वायफाय वापरल्याचे उघड झाल्यानंतर कोल्हापूरच्या पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. मात्र, कोल्हापूरच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याआधीच तो लोणावळ्याच्या दिशेने निघून गेला होता.
ज्या बसमध्ये तो बसला होता त्या बसला ट्रॅक करत पोलिसांनी त्याला लोणावळा येथे घाटात मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीची पोलिस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. तसेच त्याने हा गोळीबार नेमका का केला? यामागे सुपारी किंवा अन्य काही प्रकार होता का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा तपासात होणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.