...अन् गावित भगिनींनी ६ चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली; अंगावर काटा आणणारी थरारक भयकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:18 AM2022-01-19T06:18:26+5:302022-01-19T06:18:40+5:30

दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून जन्मठेपेची शिक्षा

thrilling horror story of the Gavit sisters who brutally murdered six children | ...अन् गावित भगिनींनी ६ चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली; अंगावर काटा आणणारी थरारक भयकथा

...अन् गावित भगिनींनी ६ चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली; अंगावर काटा आणणारी थरारक भयकथा

Next

मुंबई : सीमा गावित व रेणुका शिंदे या दोन बहिणींना २००१ मध्ये सहा चिमुकल्यांची क्रूर हत्या आणि १३ बालकांचे अपहरण केल्याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने २००४ मध्ये शिक्कामोर्तब केले. मात्र, त्यांच्या दया अर्जावर निर्णयास विलंबामुळे उच्च न्यायालयाने मंगळवारी या दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या निमित्ताने या दोघींच्या राक्षसी कृत्याची सुरुवात कशी झाली? याचा हा आढावा...

अभद्र त्रिकुटाची उत्पत्ती 
सीमा व रेणुका यांची आई अंजनाबाई ही मुलींसाठी ‘आदर्श आई’ ठरू शकली नाही. खिसा कापणे, किरकोळ चोऱ्या, याखेरीज अंजनाबाईकडे अन्य काही जीवन कौशल्य नव्हते. १९८० च्या काळात तिच्यावर १२५ हून अधिक चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले. अंजनाच्या या सवयीला कंटाळून पती मोहन गावित याने तिला सोडले. अस्वस्थ झालेल्या अंजनाबाईने याचा बदला घ्यायचे ठरविले. मोहनने दुसरा विवाह केला व त्याला एक मुलगीही झाली. दुसऱ्या विवाहापासून झालेल्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्याचा कट शिजला. या कटात अंजनाबाई आणि तिच्या दोन मुली सीमा, रेणुका यांचा समावेश होता. सुरुवातीला केवळ सूड उगवायचा होता. मात्र, नंतर सूडाच्या भावनेचे लोभात रुपांतर झाले. त्यातूनच त्यांनी चिमुकल्यांच्या अपहरणाची व हत्येची मालिका सुरू केली. 

कोल्हापुरातून सुरुवात  
१९९५ मध्ये या तिघींनी कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकातून भीक मागणाऱ्या महिलेचे ‘राजा’ हे मूल चोरले. पाठाेपाठ तेथूनच दीड वर्षाचा ‘संतोष’, श्री अंबाबाई मंदिरातून श्रद्धा ऊर्फ भाग्यश्री पाटील या बालकांचे अपहरण करून त्यांचा चोरी, पाकीटमारीसाठी वापर केला व नंतर त्यांची क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले.  

असा लागला सुगावा    
मोहन गावितची दुसरी मुलगी क्रांती हिचे अपहरण त्यांना भोवले. अंजनानेच आपल्या मुलीचे अपहरण केले असावे, याबाबत मोहन आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला खात्री होती. पोलिसांनाही त्याची खात्री झाली आणि त्यातूनच पुणे, कोल्हापूर आणि नाशिक येथे झालेल्या लहान मुलांच्या अपहरणाचा आणि हत्येचा पर्दाफाश झाला. ४३ बालकांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. मात्र, १३ मुलांचे अपहरण व सहा मुलांची क्रूर हत्या केल्याचेच पुरावे पोलिसांना मिळाले होते. 

अखेर भरला पापाचा घडा 
१९९६ पर्यंत या तिघी सतत आपला ठावठिकाणा बदलत होत्या. पोलिसांनी रेणुकाचा नवरा किरण शिंदे याला अटक केली. त्याला पोलिसांनी ‘माफीचा साक्षीदार’ केले. या दोघींच्या घरात हरविलेल्या मुलांचे कपडे सापडले. अनेक अनोळखी लहान मुलांचे फोटोही हाती आले. अखेरीस सीमाने क्रांतीचे (मोहन गावितची मुलगी) अपहरण आणि हत्येबद्दल माहिती दिली. हे सर्व आईच्या आदेशावरून केल्याचे सीमाने पोलिसांना सांगितले. 
अटकेनंतर जेमतेम एक वर्षात अंजनाबाईचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर दोन बहिणींवर खटला चालला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने रेणुका व सीमा या दोघी बहिणींना २८ जून २००१ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने या दोघींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रपतींकडे आरोपींचा दयेचा अर्ज तब्बल ७ वर्षे प्रलंबित राहिला, त्यामुळे गावीत बहिणींना त्याचा फायदा होऊन फाशी शिक्षेचा निर्णय आजन्म कारावासात झाला. भारतीय घटनेनुसार राष्ट्रपतींकडे दिलेल्या दयेच्या अर्जाचा निकाल किती दिवसात द्यावा, यासाठी कालमर्यादा नाही. पण आता कालमर्यादेची गरज आहे. यापूर्वीही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे अनेक फाशीच्या शिक्षेच्या निकालाचे जन्मठेपेत परिवर्तन झाले आहे.     - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील
 

Web Title: thrilling horror story of the Gavit sisters who brutally murdered six children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app