Three-vehicle accident at Juinagar | जुईनगर येथे तीन वाहनांचा अपघात

जुईनगर येथे तीन वाहनांचा अपघात

नवी मुंबई : जुईनगर येथे तीन वाहनांचा अपघात होऊन चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस कारला धडकल्याने हा अपघात घडला. त्यामध्ये जखमी झालेल्या चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायन-पनवेल मार्गावर रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जुईनगर येथे अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस त्याठिकाणी आली असता हा अपघात झाला. बस चालकाकडून समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे ही बस समोरील इको कारला जोरदार धडकली. त्यामुळे कार चालकाचाही ताबा सुटून दोन्ही वाहने पुढील एका डम्परला धडकली.
या अपघातामध्ये इको कार पलटी झाली असता, त्यामधील चौघे जण जखमी झाले. त्यापैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गायकवाड यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने
जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने बसच्या मागून येणाऱ्या इतर वाहनांच्या चालकांनी त्यांच्या वाहनांवर ताबा मिळवल्याने इतरही वाहने त्यांना धडकण्याचे टळले, अन्यथा मोठी दुर्घटना घडून जीवितहानीची शक्यता निर्माण झाली होती.
या अपघातामुळे त्याठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी बस व कार क्रेनच्या साहाय्याने त्याठिकाणावरून हटवून रहदारीतला अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Three-vehicle accident at Juinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.