खूनप्रकरणात तिघा सख्खा भावंडांना जन्मेठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:09 PM2021-09-30T23:09:50+5:302021-09-30T23:10:17+5:30

Crime News : रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघे रा.बोरखळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Three siblings sentenced to life imprisonment in murder case | खूनप्रकरणात तिघा सख्खा भावंडांना जन्मेठेपेची शिक्षा

खूनप्रकरणात तिघा सख्खा भावंडांना जन्मेठेपेची शिक्षा

Next

सातारा : बोरखळ, ता.सातारा येथे भरदिवसा चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने एकाला मारहाण करून खून केल्याप्रकरणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधिश एन.एल. मोरे यांनी तिघा सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, रानामध्ये शेळ्या चरल्यानंतर त्यातून झालेल्या वादावादीतून ही घटना घडली होती.

रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघे रा.बोरखळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय ४०, रा.बोरखळ) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारारण पाटील (वय ४८) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या खटल्याची माहिती अशी, तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे दि. २८ जून २०१६ रोजी दुपारी २.३० वाजता बोरखळ मधील कोळकीचा माथा येथे शेळ्या चारत होते. त्यावेळी संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात शेळ्या गेल्या. या कारणातून पाटील रसाळ यांच्यामध्ये वाद झाला व त्यातून पाटील यांना काठीने मारहाण झाली.

या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबिय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले. याचवेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले व जागीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी तिन्ही भावांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड. तो दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार शुभांगी भोसले, पूर्णा यादव, घाडगे यांनी सहकार्य केले.

Web Title: Three siblings sentenced to life imprisonment in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.