Hampi Crime: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हम्पीमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात कर्नाटकच्या गंगावती सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका परदेशी इस्रायली महिला पर्यटकावर आणि होमस्टेच्या मालकिणीवर बलात्कार करून एका पर्यटकाची हत्या करणाऱ्या तीन नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मल्लेश उर्फ हांडीमल्ला, साई आणि शरणप्पा अशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावे आहेत. २६ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या गुन्ह्याला रेअर ऑफ द रेयरेस्ट ठरवत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सदानंद नागप्पा नायक यांनी ही कठोर शिक्षा सुनावली.
ही घटना २६ मार्च २०२५ रोजी रात्री ११ ते ११:३० च्या सुमारास हम्पी जवळील सनापूर तलावाच्या परिसरात घडली होती. २९ वर्षीय होमस्टे मालकीण आपल्या चार पुरुष पाहुण्यांसोबत (ज्यात अमेरिका, महाराष्ट्र आणि ओडिशाचे पर्यटक होते) आणि एका इस्रायली महिला पर्यटकासोबत तुंगभद्रा कालव्याच्या काठावर बसली होती. तिथे अचानक दुचाकीवरून तीन आरोपी आले. सुरुवातीला त्यांनी पेट्रोल पंप कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी इस्रायली महिलेकडे १०० रुपयांची मागणी केली. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी शिवीगाळ करत हल्ला चढवला.
पर्यटकाला कालव्यात फेकले
जेव्हा पुरुष पर्यटकांनी महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तिन्ही पुरुष पर्यटकांना जबरदस्तीने तुंगभद्रा कालव्याच्या पाण्यात ढकलून दिले. यात ओडिशातील एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, ज्याचा मृतदेह सकाळी तलावात सापडला. इतर दोन पर्यटक जखमी अवस्थेत बाहेर पडले.
सामूहिक बलात्कार आणि पळ काढला
पुरुष पर्यटक कालव्यातून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत असतानाच, या नराधमांनी इस्रायली पर्यटक आणि होमस्टे मालकिणीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, विशेष पोलीस पथकाने तपास करून त्यांना बेड्या ठोकल्या.
न्यायालयाने ओढले कडक ताशेरे
तपासादरम्यान मिळालेले पुरावे, पीडितांचे जबाब आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे न्यायालयाने तिघांनाही दोषी धरले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हम्पी सारख्या ठिकाणी परदेशी पर्यटकांसोबत घडलेला हा गुन्हा देशाच्या प्रतिमेला धक्का लावणारा ठरला होता. त्यामुळेच समाजात कडक संदेश जावा यासाठी न्यायालयाने या नराधमांना फासावर लटकवण्याचे आदेश दिले आहेत.
Web Summary : Karnataka court sentenced three to death for raping an Israeli tourist and a homestay owner, also killing a tourist in Hampi in 2025. The heinous crime shocked the nation.
Web Summary : कर्नाटक की अदालत ने हम्पी में 2025 में एक इजरायली पर्यटक और एक होमस्टे मालिक के साथ बलात्कार और एक पर्यटक की हत्या के लिए तीन को मौत की सजा सुनाई। जघन्य अपराध ने देश को झकझोर दिया।