नालासोपारा स्फोटकांप्रकरणी लंकेश हत्याकांडातील काळेसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 06:05 IST2018-10-07T06:05:09+5:302018-10-07T06:05:45+5:30
नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली.

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी लंकेश हत्याकांडातील काळेसह तिघांना अटक
मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली. विशेष न्यायालयाने शनिवारी तिघांना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखडूर्ली लोधीसह गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना अटक करण्यात आली होती. या नवीन अटकेमुळे हा आकडा १२ वर पोहोचला आहे.
शनिवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तिघांना विशेष न्यायालयात हजर केले. हिंदुत्ववाद्यांकडून जप्त केलेल्या डायरींमुळे या तिघांचा सहभाग समोर आल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्या डायरीही न्यायालयात सादर करण्यात आल्या. तसेच सूर्यवंशीने गुन्ह्यात कर्नाटकच्या धारवडमधून वाहने चोरी केली. या चोरीत या तिघांचाही सहभाग असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगत, तिघांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली.
आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी याला विरोध केला. चोरी प्रकरणावेळी तिघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यात त्यांचा सहभाग असणे शक्य नाही. शिवाय, त्यांचा काय सहभाग आहे, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे जास्तीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली. एटीएसने तिघांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. चौकशीतून या प्रकरणात आणखी नवे चेहरे समोर येण्याची शक्यता एटीएसने वर्तविली आहे.
विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती
एटीएसने या वेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या नियुक्तीवर आरोपींचे वकील पुनाळेकर यांनी ताशेरे ओढले. शासन विनाकारण फक्त प्रकरण चालू ठेवण्यासाठी विशेष वकिलांवर पैसे खर्च करीत असल्याचा आरोप केला आहे.