सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना
By शिरीष शिंदे | Updated: September 21, 2022 16:55 IST2022-09-21T16:54:56+5:302022-09-21T16:55:37+5:30
पॅन कार्ड अपडेटच्या नावाखाली केली होती फसवणूक

सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना
बीड: पॅन कार्ड अपडेटच्या नावाखाली एका व्यक्तीची फसवणूक करुन त्याच्या बँक खात्यावर तीन लाख रुपये कपात झाले होते. मात्र बीड येथील सायबर क्राईम पोलिसांनी वेळीस सतर्कता दाखवली. त्यामुळे तीन लाख रुपयांची रक्कम पुन्हा संबंधित व्यक्तीला मिळाली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत फिर्यादीने सायबर अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील अनिल कोळेकर यांना मोबाईलवर २५ ऑगस्ट रोजी एक मेसेज आला. पॅन कार्ड अपडेट करा अन्यथा तुमचे एसबीआय योनो खाते बंद केले जाईल असा एसएमएस इंग्रजीमध्ये आला. मेसेजमधील लिंकवर त्यांनी क्लिक करुन पॅन नंबर टाकला असता त्यांना ओटीपी आला. हा ओटीपी आपोआप रकान्यांमध्ये भरला गेला. त्यानंतर त्यांच्या खात्यामधून तीन लाख रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. त्यांनी तत्काळ बीड येथील सायबर पोलिसांशी संपर्क केला.
सायबर पोलिसांनी बीड येथून व्यवहाराची तपासणी करुन सदरील रक्कम गोठविण्याचे नोडल अधिकारी व बँक मॅनेजरला ईमेलद्वारे कळविले. ही रक्कम पेयु पेमेंट प्रा.लि या ठिकाणी गेल्याचे दिसून आले. बीड सायबर पोलिसांनी पेयु कंपनीशी संपर्क साधून फिर्यादी कोळेकर यांची फसवणूक करुन गेलेली तीन लाख रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करुन घेतली. ही कारवाई पोलीस अधीक्षक ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक आर. एस. गायकवाड व उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी केली.