ठाण्यात विक्रीसाठी आणलेली तीन कोटींची व्हेल माशाची वांती हस्तगत; दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: December 22, 2023 18:48 IST2023-12-22T18:47:17+5:302023-12-22T18:48:16+5:30
श्रीनगर पोलिसांची कारवाई: उच्च प्रतिच्या अत्तर निर्मितीसाठी होतो वापर

ठाण्यात विक्रीसाठी आणलेली तीन कोटींची व्हेल माशाची वांती हस्तगत; दोघांना अटक
ठाणे : उच्च प्रतीच्या अत्तर (सेंन्ट) निर्मितीसाठी आवश्यक असलेली व्हेल माशाच्या ( उलटी ) वांतीच्या तस्करीसाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील मुझमिल मझर सुभेदार (४५) आणि म्हसळा येथील शहजाद शब्बिर कादरी (४५) या दोघांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटींची किमतीचे अंबरग्रीस अथार्त व्हेल माशाची उलटी (वांती) हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. दोन्ही आरोपींना २६ िडसेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ येथे काही जण व्हेल माशाच्या वांतीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे, जमादार माणिक इंगळे, हवालदार नयना बनसोडे आणि मुकींद राठोड आदींच्या पथकाने वनविभागाचे वनपाल अशोक काटेस्कर आणि मनोज परदेशी आदींच्या पथकाने यातील दोघा संशयितांना सापळा लावून ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये एका सॅकमध्ये पिवळया रंगाच्या प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळलेली सुमारे तीन कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची वांती जप्त केली. व्हेल माशाच्या वांतीचा (अंबेगिरीस) मोठ्या आकाराचा तुकडा हा तपकिरी रंगाचा आहे. वन्यजीव अधिनियमानुसार ते मृगयाचिन्ह असून ते अनुसुची एकमध्ये मोडते. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी व्हेलची ही वांती नेमकी कुठून आणली आणि ती कोणाला विक्रीसाठी नेली जात होती. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत किंवा कसे ? याचा तपास सुरू असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.