खडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 03:18 PM2020-05-28T15:18:57+5:302020-05-28T15:21:51+5:30

खंडणी प्रकरणावरुन केला होता गोळीबार; मामा गँगने पश्चिम हवेली परिसरात दहशत माजविण्याचा केला प्रयत्न

Three arrested with main accused in Khadakwasla firing case | खडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

खडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

Next
ठळक मुद्देतीन गावठी पिस्टल व ९ काडतुसे जप्त

पुणे : खंडणीच्या कारणावरुन खडकवासला येथे गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार 'मामा' गँगचा म्होरक्या चेतन लिमण याच्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्टल व ९ काडतुसे जप्तकरण्यात आली आहेत. टोळीप्रमुख चेतन ऊर्फ मामा गोविंंद लिमण (वय २८, रा. खडकवासला), किरण महेंद्र सोनवणे (वय २३, रा. किरकटवाडी, ता़ हवेली) आणि दिगंबर दीपक चव्हाण (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजू सोनवणे हा व्यावसायिक असून त्याच्याकडे चेतन लिमण हा गुन्हेगार ४ महिन्यांपासून जबरदस्तीने खंडणी वसुल करीत होता. लॉकडाऊनमध्ये चेतन याने तिघांना पाठवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पण कामधंदा नसल्याने सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. सोनवणे यांच्याकडे १७ मे रोजी विजय चव्हाण हे आले होते. रात्री ते घराबाहेर बोलत थांबले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने १० गोळ्या झाडत अंदाधुंद गोळीबार केला. त्यातील गोळी चव्हाण यांना लागली व ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान हे आरोपी डोणजे भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस नाईक राजू मोमीन, अमोल शेडगे वत्यांच्या सहकाऱ्यांनी डोणजे भागात त्यांचा शोध घेऊन तिघांना जेरबंद केले. त्यांच्या अंगझडतीत तीन गावठी पिस्टल व ९ काडतुसे मिळाली आहेत.चेतन लिमण याच्याविरुद्ध यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ५ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. किरण सोनवणे याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल असून त्यातील ३ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. दिगंबर चव्हाण याच्याविरुद्ध खंडणीचा यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. चेतन याच्या मामा गँगने पश्चिम हवेली परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. मामा गँगच्या सदस्यांनी स्थानिकांना त्रास दिल्यास न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Web Title: Three arrested with main accused in Khadakwasla firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.