अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, उकळले ३० लाखांचे दागिने
By प्रशांत माने | Updated: November 4, 2022 19:19 IST2022-11-04T19:07:50+5:302022-11-04T19:19:17+5:30
तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी सागर रजपूतला अटक

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, उकळले ३० लाखांचे दागिने
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या डोंबिवलीमधील एका १९ वर्षीय तरूणाला त्याच्या मित्रांनीच शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून एका महिलेसोबत त्याचा अश्लील व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ३० लाख रूपयांचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातील एका फार्महाऊसवर घडला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींपैकी मुख्य आरोपी सागर रजपूत याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. रजपूत हा कोल्हापूर, इचलकरंजी दत्तवाडचा रहिवासी आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत तेथील एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी पिडीत तरुणाला शीतपेयामध्ये काही तरी गुंगींचे ओैषध टाकून त्या पार्टीत आलेल्या एका महीलेसोबत त्याचे अश्लील व्हीडीओ काढले. त्यानंतर हा व्हीडीओ व्हायरल करण्याचे सांगत पिडीत तरूणाला तुझे बरे वाईट करू अशी धमकी देखील दिली गेली. अशा धमक्या सातत्याने देत त्याच्याकडून आठशे ग्रॅम वजनाचे ३० लाख रूपयांचे दागिने लाटण्यात आले. दरम्यान हा त्रास सहन न झाल्याने पिडीत तरूणाने टिळकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी सागर रजपूत, शुभम जाधव, रोहन संघराज या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी सागरला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणीत आणखीन किती जणांचा सहभाग आहे. याचा ही तपास सुरू आहे. पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.